पुणे : उच्चभ्रू समजल्या जाणार्या पुण्यातील कोथरूड परिसरात (Kothrud Area) विवाहितेचा हुंड्यासाठी (Dowry Case) अमानुष छळ करण्यात आला असून, या विवाहितेला मिरची पावडर पाण्यात मिसळून ते तिखट पाणी तिच्या तोंडात, डोळ्यात, कानात ओतल्याचा प्रकार घडला आहे. तर, जळत्या लाकडाने हातावर, पायावर व ओठावर चटकेही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पती नागेश कार्तीक साहेबन्ने (२३), रत्ना कार्तीक साहेबन्ने (४२), महादेवी जाधव (५८, सर्व रा. कोथरूड) व लिंबराज भिसे (५८, रा. केळेवाडी, कोथरूड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २२ वर्षीय तरूणीने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, पीडित महिलेबरोबर नागेशचा ऑक्टोबर २०२१ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांत सासरच्यांनी तिला माहेरहून हुंड्याचे पैसे आणण्यासाठी तगादा लावला. यातून शिवीगाळ करून तिला त्रास देण्यास सुरूवात झाली. तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तर, हिंसाचाराची सीमा पार करत तिचे हातपाय बांधून पाण्यामध्ये मिरची पावडर मिसळून ते पाणी तिच्या तोंडात, कानात, डोळ्यात ओतले. तिच्या अंगावर तोंडावर मिठाचे पाणी टाकले, चुलीतील पेटलेल्या लाकडाने तिच्या हातावर, पायावर, डोळ्याजवळ, ओठावर चटके दिले. दरम्यान, अत्याचार सहन न झाल्याने तिने सरते शेवटी पोलिसांशी संपर्क साधला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
सासूकडून मारहाण
सासूकडून मारहाण होत असल्याने पीडित महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. ही माहिती मिळताच कोथरूड पोलिसांचे मार्शल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे, अशी माहिती उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे यांनी सांगितले.