पाटस : दौंड (Daund) तालुक्यातील पाटस (Patas) येथील मागासवर्गीय समाजाचा मुलगा व सवर्ण समाजाची मुलगी प्रेम प्रकरणातून पळून गेले. म्हणून चिडलेल्या सवर्ण समाजातील ७ जणांसह अनोळखी १० ते १५ जणांनी मुलाच्या आईस मारहाण केली. या कारणावरून यवत पोलिसांनी २२ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
सोपान बेलुसे, बाबु बेलुसे, समीर हरपुडे बाळा हाळंदे, श्रीकांत पोळेकर, समीर हारपुडे याची आई, बाबु बेलुसे याची आई व इतर १० ते १५ जणांविरोधात (सर्व रा. पाटस, ता. दौंड), गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ फेब्रुवारी दरम्यान समीर हरपुडे याने पीडित महिलेच्या मोबाईलवर फोन करून ‘तुझ्या मुलाने बहिणीस पळवून नेले आहे’, अशी माहिती दिली. त्यावर पीडित महिलेने ‘त्या दोघांचे तुकडे कर’, असे सांगितले. त्यानंतर समीरच्या पत्नीनेही ‘मावशी तुम्ही घरी या, मुले कुठे आहेत माहिती आहे का?’, अशी माहिती विचारली. मात्र पीडित महिलेने आपण आजारी असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित पीडित महिला ही शेतात काम करण्यास गेली.
घर जाळून टाकण्याची धमकी
त्यानंतर शेजारील महिलेने तिच्या मोबाईलवर फोन करून या महिलेच्या लहान मुलास लोक मारहाण करीत असल्याचे सांगितले. त्यावरून घाईगडबडीने ही महिला घरी परतली असता १० ते १५ जणांनी अर्वाच्य भाषा वापरत मारहाण केली. तसेच घर जाळून टाकण्याची धमकी दिल्याची फिर्याद या पीडित महिलेने दिली. त्यावरुन यवत पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.