'विधानसभेत भाजपच मोठा पक्ष, निवडणुकीनंतरही पहिल्या क्रमांकावरच राहणार'; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पोलीस पाटलांशी संवाद साधला. यावेळी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी गृहमंत्री म्हणून संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी राज्याचा गृहमंत्री आहे मात्र पोलीस पाटील हे त्यांच्या त्यांच्या गावाचे गृहमंत्रीच आहात हे विसरु नका. तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तुमचा मोठा वाटा आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार केला याचं समाधान आहे, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या. तसेच विरोधकांनी टीका देखील केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नागपूरमध्ये कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात. काही लोकांचा शौक असा आहे की सकाळी उठून कॅमेरासमोर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पचत नाही. एखाद्या दिवशी माझा राजीनामा मागितला नाही तर त्यांना अपचन होतं. पण पोलीस पाटील संघटना अशी आहे की ज्यांनी मागे लागून त्यांचं काम करुन घेतलं. पण कुणी काम केलं ते ही संघटना विसरली नाही. आज मला इथे बोलवून माझा सत्कार केलात त्याबद्दल आपले आभार मानतो,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
तेव्हा मी चंग बांधला होता
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस पाटील यांची मोठी समस्या सोडवली. फडणवीस म्हणाले, “मला पोलीस पाटील संघटनेचे लोक भेटायचे तेव्हा मला ते सांगायचे आम्हाला हिणवलं जातं, बिन पगारी फुल अधिकारी. मी त्यांना म्हटलं काळजी करु नका, फुल पगारी आणि फुल अधिकारी असाच दर्जा आम्ही तुम्हाला देणार आहोत. तेव्हा मी चंग बांधला, मानाच्या पदाला आम्ही 15 हजार रुपये मानधन केलं. दोन तीन दिवसांपूर्वी सांगितलं असतं मी पैसे खात्यात जमा करुनच आलो असतो. सोमवारी जी. आर. निघून पैसे खात्यात गेले पाहिजेत असा आदेश मी दिला आहे. चार महिन्यांचे पैसे खात्यात जातील आणि दर महिन्याला योग्य प्रकारे तुमच्या खात्यात येतील,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.