BEST Buses decision Buses on routes with low response will be closed
मुंबई : बेस्टच्या बसची घटलेली संख्या आणि प्रवाशांना थांब्यावर बसकरिता पहावी लागणारी प्रतिक्षा वेळ वाढल्याने बेस्टने नवी शक्कल लढविली आहे. शहरातील अल्प प्रतिसाद असलेले बस मार्ग बंद करून त्यामार्गावरील बस जास्त गर्दीच्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे अल्प प्रतिसादाच्या मार्गांचा अभ्यास केला जात असून लवकरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. शहरातील असे सुमारे २० पेक्षा जास्त मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीसह भाडेतत्तावरील बसही आहेत. भाडेतत्वावरील बसला प्रवाशांसह, वाहतूक तज्ञांसह, कामगार-प्रवासी संघटनांचा विरोध आहे. तरीदेखील बेस्टने भाडेतत्वावरील बसची संख्याच वाढविण्यावर भर दिला आहे. यामुळे प्रवाशांची संख्या जास्त असलेल्या मार्गावर बसेस प्रमाण वाढणार आहे. यामुळे बेस्टच्या उत्पादनामध्ये देखील वाढ होण्यास मदत होईल.
बेस्टच्या ताफ्यात परंतु भाडेतत्वावरील बसही येण्यास विलंब होत आहे. गेल्या वर्षी 23 मे रोजी 2,100 इलेक्ट्रिक सिंगल डेकर एसी बस पुरवण्याचे कंत्राट बेस्ट उपक्रमाने निविदा प्रक्रिया राबवून एका मोठ्या कंपनीला दिले होते. यातील सुमारे 450 बस ताफ्यात आल्या आहेत. सध्या बेस्टचा एकूण ताफा हा 2 हजार 800 पर्यंत आहे. डिसेंबर 2024 मध्ये बेस्टकडे 3 हजार 175 बस होत्या. कमी ताफ्यामुळे प्रवाशांची बस थांब्यावरील प्रतीक्षा वाढली आहे. त्यातच आयुर्मान संपल्यानंतर नोव्हेंबर 2025 पर्यंत बेस्टच्या मालकीच्या साध्या 700 बसही भंगारात काढल्या जाणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बसची कमी होणारी संख्या लक्षात घेता बेस्ट उपक्रमाने बसमार्गाचा अभ्यास सुरुवात केला असून अल्प प्रतिसाद मिळत असलेले मार्ग बंद करून त्या मार्गावरील बस गर्दीच्या मार्गावर चालवण्याचे नियोजन आहे. प्रवासी संख्या कमी असलेले २० पेक्षा जास्त मार्ग बंद करण्याचा विचार सुरू असून सध्या त्याचा अभ्यास सुरू आहे. तर एक ते दोन तासांचा अंतरावर प्रवास करणारे प्रवासीही अल्पच असून हे मार्गही बंद करण्याचा विचार आहे.
उपक्रमाकडे काही नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र चालक उपलब्ध नसल्याने या गाड्या आगारात उभ्या आहेत. कुर्ला पश्चिम येथील एलबीएस मार्गावर बेस्ट बसच्या भीषण अपघातानंतर उपक्रमाने भरती प्रक्रिया, प्रशिक्षण आदींबाबत नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला होता. भाडेतत्त्वावरील चालकांसाठी एक महिन्याचे प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. यामुळे बेस्टला चालक मिळेनासे झाले आहेत. तर जे चालक उपलब्ध होणार आहेत, त्यांचे एक महिन्याचे प्रशिक्षण झाल्याशिवाय ते सेवेत येणार नाहीत. घाटकोपर बस आगारातील ५० बस, विक्रोळी आगारातील ४० पेक्षा जास्त चालक नसल्याने उभ्या आहेत.