
शेतात धान कापणी करताना वाघाचा अचानक हल्ला; तरुणाचा उपचारासाठी नेताना मृत्यू
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुणाल नेहमीप्रमाणे दुपारी १ वाजता आई वडिलांसोबत धान कापणीसाठी शेतात गेला होता. आई-वडील एका धानाच्या बांधीत कापणी करत असताना कुणाल जवळच्या दुसऱ्या बांधीत धान कापत होता. याचवेळी परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक मागून त्याच्यावर झडप घातली. मुलावर वाघाचा हल्ला होताच आई-वडील त्याच्या मदतीसाठी धावले. मात्र, समोर वाघ दिसताच ते भयभीत झाले. तरीही धैर्य एकवटून त्यांनी मोबाइलवरून गावातील नागरिकांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावकरी कुणालच्या मदतीसाठी घटनास्थळाकडे धावले. मात्र, तोपर्यंत वाघ कुणालला फरफटत २०० ते ३०० फूट अंतरावर घेऊन गेला होता.
गावकऱ्यांनी वाघाला पिटाळले
घटनास्थळी पोहोचलेल्या गावकऱ्यांनी लाठ्या-काठ्या आणि काटेरी फांद्यांच्या मदतीने आरडाओरड करून वाघाला पिटाळण्याचा प्रयत्न केला. अखेर वाघाच्या तावडीतून कुणालची सुटका करण्यात त्यांना यश आले. मात्र, तोपर्यंत वाघाच्या हल्ल्यात कुणाल गंभीर जखमी झाला होता. गावकऱ्यांनी वेळ न दवडता त्याला उपचारासाठी लाखनी येथे नेले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला भंडाऱ्याला हलविण्याचा सल्ला दिला. भंडाऱ्याला नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
वनविभागाकडून शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावला. तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले.
धान कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांसमोर नवे संकट
धान कापणी, कापलेले पीक गोळा करणे, मळणी आणि वाहतूक यासाठी शेतकरी व मजुरांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राहावे लागते. अनेक ठिकाणी कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे शेतीकामे करतात. लहान मुलांनाही सोबत नेले जाते. अशा वेळी झुडपांमध्ये दबा धरून बसलेला वन्यप्राणी अचानक हल्ला करतो आणि सावध होण्याची संधीही मिळत नाही, हे घडलेल्या दाखवून दिले आहे.
Ans: कुणाल कैलास उईके (वय २७) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
Ans: साकोली तालुक्यातील बामणी गावात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी दुपारी १ वाजता हा हल्ला झाला.
Ans: वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावला आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवले.