मुंबई : पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या मतदानासाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. मुंबईमध्ये तर प्रचाराच्या तोफा धडाडत असून महायुतीसह महाविकास आघाडीचा प्रचार सुरु आहे. काल मुंबईमध्ये बीकेसी येथे महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी अरविंद कजेरीवाल यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी मी थेट तुरुंगातून आलो आहे तुम्ही मतदान नाही केलं तर परत तुरुंगात जावं लागेल असे भावनिक आवाहन केले. त्याचबरोबर भाजपने देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण संपवले असा गंभीर आरोप देखील आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला.
मोदी देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत
मुंबईतील सभेमध्ये बोलताना अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले. केजरीवाल म्हणाले, “मी थेट तुरुंगातून आलोय. आपल्या देशाला वाचविण्यासाठी मी तुमच्यासमोर झोळी पसरवतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक सुंदर लोकशाही दिली होती. पण पंतप्रधान मोदी देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. आम्हाला पराभूत करता येत नाही, म्हणून माझ्यासह आमच्या नेत्यांना तुरुंगात धाडले जात आहे. आम्हाला तुरुंगात टाकले तर आम्ही राजीनामा देऊ असे भाजपाला वाटले. पण आम्ही तुरुंगातून सरकार चालवून दाखविले. आम्ही तुरुंगातून लोकशाही चालवून दाखवू”, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
पंतप्रधान मोदी एका गुप्त मोहिमेवर
अरविंद केजरीवाल यांनी भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित केले. केजरीवाल म्हणाले, पंतप्रधान मोदी एका गुप्त मोहिमेवर काम करत आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. “एक देश, एक नेता”, ही मोहीम त्यांनी सुरू केली आहे. त्याअंतर्गत त्यांनी देवेंद्र फडणवीस, शिवराज सिंह चौहान अशा मोठ्या प्रादेशिक नेत्यांचे राजकीय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकसभा निवडणूक संपन्न होताच आता पुढचा नंबर योगी आदित्यनाथ यांचा आहे. विरोधकांना संपवितानाच मोदी यांनी स्वपक्षातील मोठ्या नेत्यांनाही संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा खळबळजनक दावा अरविंद केजरीवाल यांनी मुंबईतील सभेमध्ये केला.