Mahadev Jankar On BJP : आगामी निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या मित्र पक्षांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. भाजपकडून (BJP) मित्र पक्षांचा वापर करून फेकून देण्यात येते असल्याचा आरोप कालच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला होता. तर, त्यानंतर आता बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपसह काँग्रेसवर टीकास्त्र
आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तुमचं काय जमलं असतं, आमच्या मुळेच तुम्ही सत्तेत आले असल्याचे बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यापाठोपाठ आज परत महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाजपसह काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे.
काँग्रेसने जे आतापर्यंत केले तेच भाजप करतेय
भाजप आता काँग्रेसच्याच पावलावर चालली आहे. किंबहुना, आजची भाजप ही काँग्रेसच झाली आहे. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येणार नाही, त्या ठिकाणी काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपात घेतले जात आहेत. मात्र खरी भाजपा ही प्रचंड नाराज असल्याचे महादेव जानकर म्हणाले. ज्या भाजपने 40 वर्ष ज्यांच्याविरुद्ध संघर्ष केला, आज त्यांनाच मांडीवर घेऊन भाजप सत्तेत बसली असल्याचे देखील जानकर म्हणाले. काँग्रेसने जे गेली 70 वर्षांत केले, आज भाजप देखील तेच करत आहे, असेही त्यांनी म्हटले.
भाजप आता काँग्रेसच्याच वाटेवर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे. पुढे ते म्हणाले, भाजप किंवा काँग्रेसला कुठलाही फरकच पडत नाही. भारतीय जनता पक्षाची जर एवढी ताकद आहे तर, मग कशाला ते एकनाथ शिंदे साहेबाला, अजित दादांना आणि अशोक चव्हाण यांना सोबत घ्यायला निघाले. हा प्रश्न आज बांधा-बांधावरच्या सामान्य शेतकरी, कष्टाकरी वर्गाला पडला आहे. तुम्ही ताकदवान, बलाढ्य असल्याचे भासवता. मात्र जनता जनार्दन ही सर्व काही असते. जनतेच्या मनात आलं तर, जनता राजाला रंका आणि रंकेला राजा करते, त्याचं नाव जनता असते. त्यामुळे आपण जनतेला गृहीत धरण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात जानकर यांनी भाजपवर टीकास्त्र डागले.
काँग्रेसमुळे भाजपाची जागा धोक्यात
आजची भाजपा ही जवळजवळ काँग्रेसच झाल्याचे चित्र आहे. ज्यावेळी भाजपाला वाटत होतं की, काँग्रेसमुळे भाजपाची जागा धोक्यात आहे, त्यावेळी त्यांनी अशोक चव्हाण यांना आपल्या पक्षात घेतलं. आज अजित दादांकडे बघितलं तर ठराविक ठराविक ठिकाणी त्यांचा देखील वजन आहे. एकनाथ शिंदे यांचे देखील राज्यातील वेगवेगळ्या पॉकेटमध्ये वर्चस्व राहिले आहे. मात्र ज्या ठिकाणी कमतरता भासते त्या ठिकाणी भाजप ती भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र खरी भाजपा ही फार नाराज असल्याचे देखील जानकर म्हणाले. आज घडीला ओरिजनल भाजप ही राष्ट्रीय समाज पक्षामध्ये येण्यास इच्छुक असल्याचा दावा देखील जानकर यांनी केला.
मुंगी छोटीच असते मात्र हत्तीचादेखील जीव घेते
आज आरएसएसला जरी माझ्याबद्दल विचारले, तरी महादेव जानकर यांना एकही व्यक्ती वाईट म्हणणार नाही. उलट ते सरळ लाईन मध्ये जात असल्याचं ते सांगतील. काल ज्यांच्यावर 70 हजार कोटींचा घोटाळा केला असा आरोप होता, आज त्यांना तुम्ही मांडीवर घेत आहात. ज्यांच्या विरुद्ध श्वेतपत्रिका काढली जाते, त्यांनाच दुसरीकडे मांडीवर घेतले जात आहे. असे असले तरी जनता पूर्वीसारखी अडानी राहिलेली नाही. मी केवळ भाजपवर टीका करत नाही, तर काँग्रेसने देखील गेल्या 70 वर्षात हेच काम केलं आहे.
मुंगी छोटीच असते, मात्र हत्तीचा……….
काँग्रेस पक्षाचा जर अभ्यास केला तर, ते देखील छोट्या पक्षांना संपवण्याचे काम करत आले आहे. राजू शेट्टी यांच्या पक्षाचा, माझ्या पक्षाचा आमदार त्यांनी पळवला आहे. आम्ही सोबत होतो म्हणून, तुम्ही मुख्यमंत्री आहे. आम्ही ज्यावेळी नसेल त्यावेळी तुमचं काय होईल हे तुम्ही बघितलं पाहिजे. असे देखील जानकर म्हणाले. हा काँग्रेस आणि बीजेपीला देखील इशारा असून मुंगी छोटीच असते, मात्र हत्तीचा देखील जीव घेते, हे लक्षात घेतले पाहिजे. असा इशारा देखील त्यांनी भाजप आणि काँग्रेसला दिला आहे.