३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल – अमित शहा
नक्षलवाद्यांच्याविरुद्ध केंद्र सरकारची मोहीम तीव्र
आत्मसमर्पण किंवा मृत्यू हे दोनच पर्याय
भारत सरकारने गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवत आहे. भारतीय सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होईल, असे मोठे विधान केले आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारकडे युद्धविराम करण्याचा प्रस्ताव धाडला होता. हा प्रस्ताव आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धुडकावून लावला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना मोठा इशारा दिला आहे. नक्षलवाद्यांनी पाठवलेला शांततेचा प्रस्ताव केंद्र सरकारने धुडकावून लावला आहे. सरकार युद्धविराम करण्याच्या बाजूने नसल्याने अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. एकतर शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे किंवा सुरक्षादलांच्या गोळ्यांचे शिकार व्हा, हे दोनच पर्याय नक्षलवाद्यांच्यासमोर असल्याचे अमित शहा म्हणाले आहे.
अमित शहा म्हणाले, “नुकतेच एक पत्र लिहून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. या पत्रात युद्धविराम होयला हवा असे सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा युद्धविराम होणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. आत्मसमर्पण करायचे असेल तर युद्धविरामाची आवश्यकता नाही. मात्र आता बोलणी नाही तर कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्याचे लक्ष्य नक्षलवाद्यांना नष्ट करणे हाच आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी मानवाधिकार संस्था आणि विचारवंतांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पीडित आदिवासींच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी या स्वयंसेवी संस्था पुढे का येत नाहीत? लांबलचक लेख लिहिणारे हे सर्व लोक आदिवासी पीडितांसाठी कधी लेख लिहितात का? त्यांना काळजी का नाही?” असे विचारत, त्यांनी त्यांची सहानुभूती ‘निवडक’ असल्याचा आरोप केला.
नक्षलवादाची सुरुवात विकासाच्या अभावामुळे झाली, असे म्हणणाऱ्यांना अमित शहा यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “डाव्या विचारसरणीचा अतिरेक विकासामुळे सुरू झाला नाही. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकांमुळे विकास थांबला.” आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी आकडेवारी दिली. २०१४ ते २०२५ या काळात नक्षलग्रस्त भागात १२,००० किलोमीटर रस्ते बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.