म्हसवड : राज्यातील मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावरुन विरोधक सतत गरळ ओकत असले तरी आरक्षणाचा प्रश्न फक्त भाजपच सोडवु शकते याची खात्री विरोधकांना पटल्यानेच विरोधक आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य शासनाला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र या दोन्ही समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप कटीबध्द असल्याचे सतोवाचन राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. तर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी सातत्याने केलेल्या पाटपुराव्यामुळेच महिनाभरातच म्हसवड शहरात नवीन तहसिल कार्यालय सुरु होईल अशी स्पष्टोक्ती विखे – पाटील यांनी दिली.
म्हसवड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ. गोरे यांच्या प्रयत्नातुन मंजुर करण्यात आलेल्या योजनेचे व विविध विकासकामांचे भुमीपुजन राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आयोजीत जाहीर सभेत ते बोलत होते, यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, मनोज घोरपडे, सोनिया गोरे, तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नितीन दोशी, विजय धट, माजी नगरसेवक डॉ. वसंत मासाळ, इंजि. सुनील पोरे, धनाजी चव्हाण, रेश्मा कलढोणे, भाजप शहराध्यक्ष बी. एम. अबदागिरे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना विखे – पाटील म्हणाले की परमेश्वराचे खरेतर आज आभार मानायला हवेत, माण – खटावसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणे यंदा भरली नाहीत पावसाने ओढ दिल्याने याठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र परतीच्या पावसाने सरकार ला काहीसा दिलासा दिला आहे. नाहीतर पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार सरकारसमोर होती मात्र ती वेळ आता येणार नाही. निसर्गसुध्दा आमच्या पाठीशी आहे त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन २०२४ पर्यंत देशातील सर्व घरात नळाचे पाणी गेले पाहिजे हे केंद्राचे नियोजन आहे त्यासाठी म्हसवड पालिकेलाही ८० कोटीचा निधी दिला आहे. तर चार्याचे संकट राज्यासमोर उभे असताना १ रुपयात पिक विमा योजना शेतकर्यांसाठी आम्ही राज्यात राबवली आहे यामुळे शेतकर्यांना त्याचा ९० टक्के लाभ झाला आहे. म. फुले जन आरोग्य योजनेतुन अनेक सामान्य जनतेला लाभ होत आहे. राज्यातील १२ कोटी जनतेला आयुष्मान भारत योजनेतुन ५ लाख रुपयांची वैद्यकिय मदत करण्यात येत आहे. मागील सरकारने फक्त आश्वासने दिली मात्र मोदी सरकार ने सामान्य जनतेला कोरोना काळात मोफत लस मोफत धान्य दिले. आज ही ८० टक्के नागरीकांना मोफत धान्य दिले जात आहे. सबका साथ सबका विकास हा मुलमंत्र घेवुन देशभरात विकासकामे सुरु आहेत, मोदीजींचे नेतृत्व व कर्तृत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. यापुर्वीच्या सत्ताधार्यांनी या भागाला वरदान ठरणार्या पाणी योजना का पुर्ण केल्या नाहीत याचा जाब सामान्य जनतेने आता विचारायला हवा. सामान्य जनतेचा विश्वासघात करणारे सत्तेत पुन्हा येवु देवु नका. म्हसवड शहरात नवीन तहसिल कार्यालय सुरु करण्याची मागणी केली आहे ती मागणी मी आज पुर्ण करण्याचा शब्द देतोय महिन्याभरात शहरात नवीन तहसिल कार्यालय सुरु होईल त्यासाठी प्रांताधिकार्यांना सुचना करण्यात आल्या आहेत असे ही शेवटी ना. विखे – पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांचा खरपुस समाचार घेत रामराजे, प्रभाकर देशमुख यांच्यावर सडकुन टिका केली. तर राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते त्यावेळी त्यांनी माण तालुक्यात एक रुपयाचा निधी का आणला नाही असा प्रश्न विचारत पुढे म्हणाले की म्हसवड नगरी चा इतिहास जुना आहे, येथील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी खुप संघर्ष आजवर करावा लागला आहे, १८५७ ची पालिका शहरात आहे. म्हसवड शहरासाठी ८० कोटी रुपयांचा निधी पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. याचा आज आपणाला मोठा आनंद होत आहे. २००९ सालापासुन येथील जनता माझ्यावर प्रेम करीत आहे त्या जनतेला काहीतरी आपण देणं लागतो म्हणुनच ही पाणी योजना आपण भाजपच्या माध्यमातुन मंजुर करुन आणली त्यासाठी ना. विखे – पाटील यांची खुप मोलाची मदत झाली आहे. पाण्यासाठी च्या माझ्या या लढ्यात खा. निंबाळकर यांची मोठी साथ लाभल्यानेच आज हे भुमीपुजन होत आहे. माझ्या पराभवासाठी गतवेळी जवळपास २२ नेते एकत्र आले तरी ही म्हसवडकर माझ्या पाठीशी ठामपणे राहिले या शहराने पावणे ५ हजाराचे मताधिक्य मला दिले आहे त्यामुळे या शहरासाठी मी विकासकामे आणली आहेत. आपली सत्ता पालिकेत आली त्यावेळी शहरातील सर्व वाड्या वस्त्यावर जाण्यासाठी निट रस्ते नव्हते, स्मशानभुमी नव्हती, बगीचा नव्हता ही सर्व विकासकामे आम्ही करुन शहराचा कायापालट केला आहे. या भागात उरमोडीचे पाणी आणुन येथील शेती पाण्याची सोय केली. तर पवार साहेबांनी या भागाला दुष्काळी ठेवण्यातच धन्यता मानली. यापुर्वी तुळशीचे लग्न लावायचे झाले तर ऊस मिळत नव्हता ही वस्तुस्थिती होती मात्र आता या मतदार संघात पाणी उपलब्ध झाल्याने आज मतदार संघात ५ साखर कारखाने सुरु आहेत. ४४ गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे त्यासाठी जिहे – कठापुर योजनेतुन अडीच टि. एम.सी. पाणी उपलब्ध होणार आहे. त्या पाण्यासाठी यापुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी म्हसवड येथेच शब्द दिला आहे. विरोधी पक्ष म्हणजे लबाडांची टोळी अशी कोपरखळी आ. गोरे यांनी मारत विरोधकांचा खरपुस समाचार घेतला. म्हसवड ला एम.आय.डी.सी. होवु नये यासाठी विरोधकांनी सर्व प्रयत्न केले मात्र त्यासाठी मी पक्ष बदलला अन् ना. फडणवीस यांनी मला शब्द दिला आता साडे ८ हजार एकरावर ती एम.आय.डी.सी. होणार आहे. जमीनीचा योग्य मोबदला जोवर तुम्हाला मिळत नाही तोवर मी स्वस्थ बसणार नाही. २४ तास म्हसवड शहरात पिण्याचे पाणी उपलब्ध करुनच मी म्हसवडकरांना मत मागायला येईल फक्त त्यासाठी किमान ६ महिन्यांचा अवधी लागणार आहे. म्हसवड शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांसाठी निधी आज उपलब्ध झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भुमिका फडणवीसांची पुर्वीपासुनच आहे. या सरकारनेच हे आरक्षण देण्याची धमक ठेवली आहे. आता धनगर समाजाच्या आरक्षणावरुन आमच्या सरकार ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र काही तांत्रिक अडचणी आहेत हे जाणुन घ्या त्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ताकत लावली आहे. शहरासाठी जे काही करता येईल ती सर्व विकासकामे करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. म्हसवड शहरात नवीन तहसिल कार्यालय सुरु करावे अशी येथील नागरीकांची मागणी आहे. जिहे – कटापुरच्या कामासंदर्भात जयंत पाटील यांनी एकदा समोरासमोर जाहीरपणे बोलावे हे माझे त्यांना जाहीर आवाहन आहे. असे शेवटी आ. गोरे म्हणाले. यावेळी आ. राहुल कुल, खा. रणजितसिंह निंबाळकर आदींनी आपल्या भाषणात आ. गोरे यांच्या कामाचे कौतुक करीत माण – खटावला दमदार व पाणीदार आमदार मिळाला असल्याचे सांगितले.यावेळी इंजि. सुनील पोरे, डॉ. वसंत मासाळ, विजय धट, शिवाजी शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
भर पावसात ३ तास जाहीर सभा –
म्हसवड शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती तर ऐन सभेच्या वेळी पावसाने चांगलाच जोर धरला यावेळी पावसामुळे सभा उधळली जाणार अशी कुजबुज सुरु होती मात्र आ. गोरे यांच्यावर प्रेम करणार्या जनतेने वरुन पाऊस पडत असताना जागा सोडली नाही.
धनगर समाजाकडुन विखे पाटील यांचा सत्कार
विखे पाटील यांच्यावर काही दिवसांपुर्वी धनगर समाजाकडुन भंडार्याची उधळण करण्यात आली होती तेव्हापासुन धनगर समाज हा ना. विखे पाटील यांच्या विरोधात असल्याचे समाजमाध्यमात पसरवले जात होते, मात्र याच धनगर समाजाकडुन ना. विखे पाटील यांचा माणदेशी घोंगडे व माणदेशी फेटा देवुन सत्कार करण्यात आला, यावेळी माणदेशी धनगर समाज हा आ. जयकुमार गोरे यांच्या पाठीशी असल्याचा जयघोषही करण्यात आला.