BJP MLA Sandeep Dhurve dance with Gautami Patil
यवतमाळ : आमदार संदीप धुर्वे यांच्या एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये आमदार संदीप धुर्वे हे डान्सर गौतमी पाटील हिच्यासोबत थिरकताना दिसत आहे. जिल्ह्यामध्ये पूरस्थिती असताना आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार संदीप धुर्वे प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सोबत नाचत आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदारांवर निशाणा साधला आहे.
उमरखेडमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमामधील हा व्हिडिओ आहे. भाजप आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा दहीहंडी महोत्सव आयोजित केला होता. यावेळी गौतमी पाटील हिला आमंत्रित करण्यात आले होते. मध्यप्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हादसिंग पाटील हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी आमदार संदीप धुर्वे गौतमी पाटील सोबत मंचावर नाचताना दिसले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विजय वडेट्टीवार यांनी देखील सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या‘ यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे. झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या – शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या‘ यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत… pic.twitter.com/YuJsmafftH — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 4, 2024
त्याचबरोबर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि जिल्ह्यातून टीकेची झोड उठल्यानंतर भाजप आमदार आमदार संदीप धुर्वे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “माझ्या कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला होता. त्यांच्या आग्रहाखातर मी ठेका धरला. मी माझ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नाराज करु शकत नाही. गौतमी पाटील या खूप फेमस डान्सर आहेत. त्या कधीही कुणासोबत नाचत नाहीत. पण मी ठेका धरल्यानंतर त्यांनीसुद्धा माझ्यासोबत ठेका धरला. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. यावेळी प्रचंड तरुण मंडळी होती, ते वातावरण तसं होतं हे सत्य आहे. विरोध करणारे विरोधक त्यांचं कामच आहे” अशी प्रतिक्रिया आमदार संदीप धुर्वे यांनी दिली आहे.
दहीहंडी महोत्सवाचे आयोजक नितीन भुतडा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे, हे मान्य आहे. त्यासाठी मी स्वतः भाजपचे सर्व आमदार पूरग्रस्त भागात भेट देवून परिस्थिती हाताळत आहे. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. त्यामुळे पूर परिस्थिती असली तरी सर्व नियोजन झाले असल्याने कार्यक्रम रद्द करणे संयुक्तिक नव्हते. या कार्यक्रमात आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी ठेका धरला तो उत्स्फूर्त होता, अशी प्रतिक्रिया भाजप समन्वयक व या दहीहंडी महोत्सवाचे आयोजक नितीन भुतडा यांनी दिली.