संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक असलेले दोन नेते गप्पा मारताना; तिसऱ्याची राष्ट्रवादी जाण्याची चर्चा
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले आहेत. त्याचे पडसाद आज राज्याच्या अधिवेशनातही उमटले. धनंजय मुंडे यांचा राजीनामाही घेण्यात आला. मात्र या सर्व घडामोडींदरम्यान धनंजय मुंडेंविरोधात रान उठवणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन नेते आणि भाजप आमदाराचा चर्चा करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या जागी सुरेश धस यांची वर्णी लागणार का? याची चर्चा सुरू आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बाजू गेले दोन महिने आमदार सुरेश धस यांनी अगदी पोटतिडकीने मांडली आहे. याच प्रकरणात जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याचीही मागणी लावून धरली होती. बीड जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी रोखण्यात मुंडेंना अपयश आलं आहे. शिवाय देशमुख हत्या प्रकरणात आरोप असलेला वाल्मिक कराड मुंडेंच्या जवळचा आहे. त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. दोन महिने हा विषय गाजत होता. दरम्यान आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सुरेश धस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे दोन नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड विधान भवनात एकत्र चर्चा करताना पहायला मिळाले. तिघांचा फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या फोटोवरून राज्यभर पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
सुरेश धस संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सुरुवातीपासून पाठपुरावा करत आहेत. विधासभेतही त्यांनी या मुद्दा उचलून धरला. या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. त्यांनतर कारवाई करत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि सध्या तो तुरुंगात असून एसआयटीकडून चौकशी सुरू आहे.
सतोष देशमुख यांची ज्यावेळी हत्या झाली त्यावेळचे फोटो आणि व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात होतं. ते एसआयटीच्या चार्जशिटमधील पुरावे काल माध्यमांच्या हाती लागले. मन सु्न्न करणार हे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. याच दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्याचे पडसाद अधिवेशनातही उमटले आहेत. या सर्व घडामोडींमध्ये अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार असल्याचंही म्हटलं आहे.
संतोष देशमुख प्रकरणात जनक्षोभ उसळला असताना सुरेश धस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचा एकत्र चर्चा करतानाचा फोटो समोर आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांच्या जोडीला आज जयंत पाटील होते. त्यामुळे याकडे अनेक अर्थांनी पाहिलं जात आहे. तिघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा सुरू होती, याचेही अर्थ लावले जात आहेत. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळू नये यासाठी कसोसीने प्रयत्न केले. आम्हाला देवेंद्र फडणवीस किंवा अन्य कोणीही चालेल पण मुंडे नको, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शेवटी मुंडेंना पालकमंत्रिपदच्या शर्यतीतून डावलण्यात आलं. आता मंत्रिपदही गेलं. बीडचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे सुरेश धस यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते का? अशी चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीपासून जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच जयंत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भेट झाली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विखे पाटील यांना प्रश्न विचारला असता जयंत पाटील योग्य निर्णय घेतील, असं त्यांनी म्हटलं होतं. रात्री उशीराने चंद्रशेखर बावनकुळे निवास्थानी ही भेट झाली होती. त्यामुळे आजचा सुरेश धस यांच्यासोबतचा त्यांचा फोटो समोर आला आहे, त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. आता या फोटोवरून आणि मागच्या काही दिवसातील घडामोडींवरून सुरू असलेल्या चर्चा सत्यात उतरतात की या केवळ चर्चाच राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.