
'मी कारवाईला सामोरं जायला तयार, तो विषय...'; प्राजक्ता माळीसंदर्भात वक्तव्यावर सुरेश धस यांचं उत्तर
आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीवर केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं असून प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत घेत जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या प्रकरणात महिला आयोगानेही पोलिसांना या प्रकरणात निर्देश दिले आहेत. महिला आयोगाने कारवाई सुरु केल्यानंतर सुरेश धस यांनी पुन्हा यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बीडमध्ये आज सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्राजक्ता माळी प्रकरणावर प्रश् विचारला. त्यावर सुरेश धस म्हणाले, जे काही झालं, त्याला मी सामोरं जायला तयार आहे. मला वाटतं, माझी बाजू अनेकांनी मांडली. संतोष देशमुख आणि बीडमधील जंगलराज या प्रकरणावरून लक्ष दुसरकडे वळवू नका. संतोष देशमुख प्रकरण आणि जिल्ह्यातील माजलेली दादागिरी यावर बोला’, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘बीडमध्ये १०५ शस्त्र परवाने रद्द झाले आहेत. उर्वरित परवण्याबाबत पडताळणी केल्यानंतर लवकरच कारवाई होणार आहे. कोणत्या पोलीस अधीक्षकाच्या यांच्या काळात अधिक शस्त्र परवाने दिले याची तपासणी होणार आहे. पुढील १५ दिवसांत कारवाई झाली नाही, तर त्यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ज्या लोकप्रतिनिधींनी यासाठी शिफारशी दिल्या, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. परळीत मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने वाटण्यात आले आहेत. त्यामागे त्यांचे आका आहेत. राखेचे धंदे करण्यासाठी हे परवाने लागतात का, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
‘आरोपींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई अधिक वेगाने झाली पाहिजे. मग समोर येईल की त्यांच्या सोबत कोणाची प्रॉपर्टी आहे? मला फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रश्न विचारा. आरोपींची संपत्ती ही कोट्यवधींची आहे. जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही. तोपर्यंत मी बोलणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे माझे नेते आहेत. ते जे म्हणाले, त्याप्रमाणे आम्ही कोणत्याही बाबतीत अडथळा आणणार नाही. माझ्या विरोधात कोणताही नेता बोलला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
‘रोज शेकडो टिप्पर राखेचा उपसा केला जातो, याबाबत पोलीस अधीक्षकांना माहिती देणार आहे. पर्यावरण खात्याने थर्मलमुले होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष द्यावे. बडा नेता कोण हे मला माहीत नाही. ज्या आकांवर खंडणीचा गुन्हा आहे, तो दोन कोटींचा असल्यांचा दावा त्यांनी केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेच बीडचे पालकमंत्री हवे आहेत. माझ्या मतदारसंघातील गैरप्रकार बंद केले आहेत. बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकारावं अशी मागणी केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.