
आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे विजयी
नगरसेवक पदाच्या एकूण जागांपैकी बहुतांश जागांवर भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आळंदीच्या विकासावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते. मात्र, आळंदीकरांनी विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाजपच्या झोळीत मतांचे दान टाकले आहे.
भाजपची लाट असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काही प्रभागांत आपले अस्तित्व राखण्यात यश मिळवले आहे. काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजपला कडवी झुंज दिली, मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आले. काँग्रेसला या निवडणुकीत मोठी गळती लागल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
आळंदी नगरपरिषदेची मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. प्रशासनाने केलेल्या चोख नियोजनामुळे निकालाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. निकाल जाहीर होताच आळंदी शहरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत हा विजय साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, भाजपच्या अनेक दिग्गज नगरसेवकांनी आपले गड राखण्यात यश मिळवले असून, आळंदीच्या मतदारांनी काही नवीन आणि तरुण चेहऱ्यांनाही यावेळेस नगरपरिषदेत काम करण्याची संधी दिली आहे.
आळंदी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि २०२५ च्या निकालाने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला आळंदीत पुन्हा उभारी घेण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागणार आहे.
मी आळंदीकराना सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणार आहे तसेच इंद्रायणी नदी पाणी तीर्थ म्हणून भाविक येतात त्यासाठी मी एसटीपी प्लांट करुन भाविकांना स्वच्छ तीर्थ व तसेच आळंदीतल्या नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपयोजना करणार आहे तसेच महिलांसाठी लखपती योजना अमलात आणणार, विविध विकास कामे करणार. – प्रशांत पोपट कुऱ्हाडे (लोकायुक्त नवनिर्वाचित
नगराध्यक्ष)