
सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
सासवड नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच शिवसेनेचे सचिन भोंगळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करून प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली. मात्र भाजपमध्ये यावेळी प्रथमच इच्छुकांची संख्या मोठी असल्याने कोणाला कोणत्या प्रभागात उमेदवारी द्यायची हे निश्चित झालेले नव्हते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एकच दिवस बाकी असताना उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
भाजपच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी शेवटी काय होईल ते बघू अशा भूमिकेतून स्वतःहून अर्ज दाखल केले होते. काहींनी थेट पक्ष बदल करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोणाकोणाला उमेदवारी मिळणार ? याचीच सर्वत्र चर्चा सुरु होती. माजी आमदार संजय जगताप यांनी यावेळची निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेल्याने शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवला होता. अखेर संजय जगताप यांच्या मातोश्री आणि यापूर्वी दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून कामकाजाचा अनुभव असलेल्या आनंदिकाकी चंदुकाका जगताप यांनाच उमेदवारी निश्चित करण्यात आली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात शिवसेनेची आघाडी
मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आलेले होते. त्यापैकी सचिन भोंगळे यांना पहिल्याच झटक्यात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. डॉ. अस्मिता रणपिसे यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्याचप्रमाणे आमदार विजय शिवतारे यांनी इतर सर्वच प्रभागांत उमेदवार जाहीर करून त्यांना पक्षाचे अधिकृत एबी फोर्म देखील वाटून टाकले. तर अडचणीच्या प्रभाग मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसशी (अजित पवार गट) युती करून एक एक अडथळा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपकडे मात्र उमेदवारांची मोठी यादी
दरम्यान शिवसेना, भाजप आणि महाविकास आघाडीसह अनेक अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. यामध्ये शिवसेनेचे प्रभागनिहाय अर्ज असून भाजपकडे मात्र उमेदवारांची मोठी यादी असल्याने अधिकृत उमेदवार कोण आणि माघारी कोण घेणार हे अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. मात्र अपक्ष उमेदवार अखेरच्या क्षणी कोणाला मदत करणार आणि भाजपकडून अधिकृत उमेदवार कोण हे त्याच दिवशी ठरणार आहे. परंतु खरी लढत माजी नगराध्यक्षा आनंदिकाकी जगताप आणि माजी नगरसेवक सचिन भोंगळे यांच्यातच होणार असल्याने या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.