सातारा : भाजपच्या वरिष्ठ प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात आजपासून ‘गाव चलो अभियान’ सुरू झाले आहे. भाजप सातारा जिल्हा कार्यकारिणीचे ‘गाव चलो अभियान’ कार्यशाळा, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथील कनिष्क मंगल कार्यालयात पार पडली. भाजपचे कार्यकर्ते जिल्ह्यातील १८०० गावांमध्ये केंद्र व राज्याच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार व प्रचार करणार असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले.
‘गाव चलो अभियान’ ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत होणार असून, प्रत्येक कार्यकर्त्याला दोन बूथ दिले जाणार आहेत. त्या ठिकाणी २४ तास घालवणे बंधनकारक आहे. या अभियानासाठी सातारा जिल्ह्यातील, प्रत्येक विधानसभेत प्रवासी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकर्त्याने अभियान काळात आपला संपूर्ण वेळ पक्षासाठी देणे अपेक्षित आहे. प्रत्येकाने आपल्याबरोबर आवश्यक वस्तू, साहित्याबरोबर औषधेही घेऊन जायची आहेत.
जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले की, आपल्याकडे मिळालेल्या संबंधित बूथ समितीची बैठक आयोजित करणे, मतदार याद्यांचे वाचन करणे, नव्या मतदारांची नोंदणी करणे, विकसित भारतसाठी ब्रँड अँबेसिडर बनविणे, प्रचार मोहिमेचा आढावा घेणे, विकसित भारत संकल्प यात्रेसाठीच्या नोंदणीकृत व्यक्तीची माहिती घेणे, याबरोबरच पक्षाने दिलेली कामे, मागवलेली माहिती एकत्र करायची आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.