मुंबई: लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षांनी भाजपवर संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे निवडणुकीत भाजपला दणका बसला. लोकसभा निवडणुकीपूर्वी 400 पारचा नारा देणारी भाजपला 240 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर देशातील जवळपास तीन राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. हरयाणा आणि जम्मू-कश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत.तर महाराष्ट्राची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकार चांगलेच अलर्ट झाले आहेत.
हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने दलितांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई येथे ‘बुद्धाचा मध्यम मार्ग – जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शक’ या विषयावर विशेष परिषद आयोजित केली होती. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हेही वाचा: आता खासगी, सरकारी शाळांमध्ये मराठी सक्तीची; ग्रेड नव्हे थेट मुल्यांकनाने देणार गुण
यावेळी परिषदेला संबोधित कराताना किरेन रिजिजू म्हणाले की, जगाची सेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. बौद्ध धर्म हा कर्मावर आधारित आहे. या धर्मात हिंसा असे काहीही नाही, तर भगवान बुद्धांनी जगाला अहिंसा, दया आणि करुणेचा संदेश दिला आहे. जगाची सेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार अंगीकारले पाहिजेत. या कार्यक्रमाला राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंग लालपुरा, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ.मिलिंद कांबळे, डॉ.दमेंदा पोरजे यांच्यासह मोठ्या संख्येने भिक्षू व अनुयायी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून रिजिजू म्हणाले की, महाराष्ट्राच्या पावन भूमीवर या परिषदेचे आयोजन करण्यात येत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाने भारताला जगातील सर्वात सुंदर संविधान दिले आहे. या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. महाराष्ट्रातील अल्पसंख्याक आणि बौद्ध धर्मासाठी काम करणाऱ्या संघटनांनी शासनाच्या मदतीने राज्यातील प्रत्येक प्रादेशिक विभागात संविधान सभागृह निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. अल्पसंख्याक समाजासाठी अभ्यास केंद्रे, नोकरदार महिला आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा: डायबिटीजचे रुग्ण, आता सावध व्हा! रोजच्या सेवनातील ‘हे’ पदार्थ पडतील महागात