
Raj Thackeray Thane Speech: भाजपचे लोक पैसे वाटतायेत आणि शिंदेंची लोकं ते पकडतायेत काय चाललंय तेच कळत नाही. पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा लागली आहे या सरकारमध्ये नेमकं काय सुरू आहे? यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? “जर यांनी विकास केला असेल तर पैसे का वाटत आहेत?” असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकेर यांनी केला.
कल्याण डोंबिवलीतील अनेक लोक आहेत ज्यांना कोटींच्या ऑफर दिल्या गेल्या. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पुजा धात्रक यांना १५ कोटींची ऑफर दिली गेली. ठाण्यात राजश्री नाईक यांनाही पाच कोटींची सुशील आवटे यांना एक कोटीची ऑफर दिली होती. पण त्या सर्वांनी ती नाकारली आणि आज ते स्वाभिमानाने निवडणूक लढवत आहेत. पण आज जे लोक पाच पाच हजाराला आपली मते विकत आहेत. मत विकणारे हे लोक आपल्या मुलांना काय उत्तरे देतील असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) काल ठाण्यात संयुक्त सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे बोलत होते. यावेळी ५ कोटींची ऑफर नाकारणाऱ्या राजश्री नाईक आणि सुशील आवटे यांना मंचावर बोलवत राज ठाकरेंनी त्यांची पाठ थोपटली. तसेच ठाणे हे मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा इतिहास असलेले शहर असल्याचे सांगत, ठाण्यासह आजूबाजूच्या शहरांच्या अस्तित्वावर घाला घालण्याचे कारस्थान सुरू असताना नागरिकांनी स्वस्थ बसू नये, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
यावेळी राज ठाकरेंनी बदलापूर प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपकडून स्विकृत नगरसेवकपद देण्याच्या मुद्द्यावर संताप व्यक्त केला. बदलापूरमधील एका लहान मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर केला, त्याला ठार मारला गेला. पण का, कशासाठी? या नराधमांना ठार मारल पाहिजेच त्याबद्द्ल वाद नाही. पण एन्काउंटरमध्ये ठार का मारायचं यात काही गुपित होत का, आरोपी काही गुपिते उघड करणार होता का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
याच बदलापूर प्रकरणातील सहआरोप तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची भाजपची हिंमतच कशी होती. पण आमच्या मनसेच्या अविनाश जाधव यांनी मोर्चाची धमकी दिल्यानंतर त्याने माघार घेतली. बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला स्वीकृत नगरसेवकपद देण्याची हिंमत कशी होते. कारण त्यांनी तुम्हाला गृहित धरलं आहे. आलात की पाच -पाच हजार रुपये तोंडावर फेकू आणि तुमची मते विकत घेऊ, अशी बोचरी टीका केली.
मी गौतम अदानीचे प्रकरण काढलं तर किती मिरच्या झोंबल्या मग माझे आणि गौतम अदानीचे फोटो बाहेर काढले. माझ्या घरी गौतम अदानीच नव्हे तर, रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा येऊन गेलेत. अनेक हिंदी चित्रपटाचे अभिनेतेही येऊन गेलेत. ते घरी येऊन गेले म्हणून मी काय त्यांची पापं झाकायची का,असा खडा सवालही त्यांनी विचारला. विमानतळ, बंदरे, वीज यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर एका मोठ्या उद्योगपतीला मक्तेदारी निर्माण करू दिल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही, मात्र एकाच व्यक्तीवर एवढी मेहरबानी का केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण व्यवस्था ठप्प करण्याची क्षमता एका उद्योगपतीच्या हाती एकवटली जाण्याची भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर, ज्या ज्या दिवशी प्रश्न महाराष्ट्राचा असेल त्यावेळी राज ठाकरे दोस्ती-बिस्ती बघणार नाही. असही त्यांनी ठामपणे सांगितलें