गावखेड्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! नागरिकांच्या जिवाशी खेळ, समितीकडून झाडाझडती तरीही आळा बसेना
मुख्य भागासह शहरातही बोगस, डॉक्टर, वैद्य अ-बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना हे बोगस डॉक्टर कावीळ, मूळव्याध, लैंगिक समस्यांसह कॅन्सर या आजारांवर हमखास उपचाराचा दावा करतात, अनेकदा तर अघोरी उपचार पद्धतीचादेखील अवलंब करतात. गुन्हा दाखल होऊनही पळवाट मिळत असल्याने गावखेड्यात बिनधास्त दुकानदारी थाटली जात आहे. रुग्णांनी आपल्या गावात उपचार करून घेण्यापूर्वी संबंधितांकडे वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी आहे का, याची तपासणी करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आरोग्यसेवेचे जाळे विणण्यात आले आहे. मात्र, शासकीय आरोग्य संस्थेत डॉक्टर नियमित उपस्थित राहत नाही. आरोग्य तपासणी झाल्यास औषधी मिळत नाही. यामुळे रुग्ण गावात असलेल्या डॉक्टरच्या रुग्णालयाची पायरी चढतात. अघोरी पद्धतीने उपचार करण्यात येत असल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळला जातो. हायडोस औषधी दिल्या जात असल्याने रुग्णाला सुरुवातीला बरे वाटते. मात्र, नंतर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. बोगस डॉक्टरांची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर समिती असते.
तक्रारी प्राप्त झाल्यास या समितीकडून झाडाझडती घेतली जाते. पण एकाच गावात वर्षानुवर्षे असल्याने बंगाली डॉक्टरांकडून गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला जातो. एखादी तक्रार झाल्यास याच विश्वासाचा फायदा घेत सहीसलामत आहेर पडण्याचा फंडा त्यांच्याकडून अवलंबण्यात येतो. मूळव्याध, काविळच नव्हे तर कॅन्सरवरही हमखास उपचार करण्यात येतो, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येतो. ग्रामीण भागातील रुग्ण विश्वासाने त्यांच्याकडे जातात. मात्र त्यांचा घात होतो.वर्षभरात ६५ डॉक्टरांविरुद्ध तक्रारी : अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांबाबत वर्षभरात ६५ तक्रारी करण्यात आल्या. त्यापैकी ६० तक्रारींबाबत समितीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पडताळणी केली. यात यवतमाळ, वणी, घाटंजी, पुसद या चार तालुक्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या बोगस डॉक्टरांवर विभाग कधी कारवाई करणार याकडे लक्ष आहे.
ग्रामीण भागात तज्ञ म्हणून मिरवणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांकडे ना पदवी आहे. ना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना. एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली कंपाउंडर म्हणून काम केल्याचा असलेल्या अनुभवाच्या जोरावर काही जण दवाखाना थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा गोरखधंदा करताना दिसतात. अशा बोगस डॉक्टरसंदर्भात असलेल्या तक्रारींची शहानिशा करून कारवाई करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर समिती आहे. तालुका समितीत तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, ठाणेदार, आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश असतो. तर, जिल्हास्तरीयमध्ये जिल्हाधिकारी, डीएचओ, एसपी आदींचा समावेश आहे.






