
Shivsena UBT leader Vasant More, NCP Sharad Pawar, Pune Vidhan Parishad Election, Congress,
Vasant More on Vidhan Parishad : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे (Vikram Kakde) यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. पण काकडे यांच्या बिनविरोध निवडीनंतर महाविकास आघाडीत मात्र नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवारी श्रीकांत पाटील यांन उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसने विश्वासघाताचा आरोप केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त करत पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार सुरू असल्याचे म्हटले आहे.
वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर थेट निशाणा साधला. “महाविकास आघाडीचा तिसऱ्यांदा विश्वासघात झाला आहे. पुण्यातील घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत मी वरिष्ठ नेत्यांकडे भूमिका मांडली आहे,” असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे. इतकच नव्हे तर, “दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आतून एकच आहेत. ही राजकीय भाऊबंदकी असून त्याचे गंभीर परिणाम महाविकास आघाडीला भोगावे लागतील. प्रत्येक निवडणुकीत अशा प्रकारे तडजोडी होत राहिल्या तर आघाडीचे नुकसान होईल.” असा आरोपही मोरेंनी केला आहे.
पुणे विधान परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात महायुतीकडून विक्रम काकडे रिंगणात होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
पण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही राजकीय घडामोडी घडल्या. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची यांची भेटली आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत श्रीकांत पाटील आणि डमी उमेदवार तुषार कामठे यांनी अर्ज मागे घेतला.
दुसरीकडे भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीसमोर अडचण निर्माण झाली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर प्रदीप कंद यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतला.
अर्ज माघारीची मुदत संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना प्रदीप कंद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. श्रीकांत पाटील, तुषार कामठे आणि प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला.
पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद उघडपणे समोर आले आहेत. काँग्रेसनंतर आता शिवसेना (ठाकरे गट) कडूनही नाराजी व्यक्त करण्यात आल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.