Nagpur Vidhan Parishad: नागपूर विधान परिषदेला 'बिनविरोध'चा फॉर्म्युला अपयशी; पोतदार विरुद्ध लोंढेंमध्येथेट लढत
Nagpur Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखेरपर्यंत केलेली विनवणी निष्फळ ठरली. गुरुवारी अखेरच्या दिवशी काँग्रेसच्या डमी उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने महायुतीकडून भाजपचे डॉ. राजीव पोतदार आणि महाआघाडीकडून काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत होणार आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संख्याबळाचा विचार करून निर्णय घेतल्यास महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होऊ शकतात, अशी आशा बावनकुळे यांनी व्यक्त केली होती. त्यास निम्मे यश मिळाले. अर्ज मागे घेण्याच्या सहा तास आधी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी परत एकदा काँग्रेसला साद घातली होती, हे विशेष… संख्याबळाच्या आधारे भाजपचे पारडे जड असले तरी त्यांनी सर्व मतदारांशी संपर्क साधण्याची तयारी केली आहे.
याउलट काँग्रेससाठी भाजप मतदारांशी संपर्क साधणे कठीण जाईल, असे मानले जात आहे. नागपूरमध्ये काँग्रेसला उमेदवार देताना बरीच दमछाक करावी लागली. बिनविरोध निवडणूक होऊ नये, यावर बहुतांश नेते ठाम होते. अर्ज भरण्याच्या एक तास आधी अतुल लोंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि अर्ज भरल्यानंतर तीन तासांनी पक्षाने त्यांच्यासह अन्य उमेदवारांची घोषणा केली.
काँग्रेसचे डमी उमेदवार दिनेश ढोले, राजेश जंगले, – सुरेद्र लोही यांनी गुरुवारी अर्ज मागे घेतला. भाजपकडून संपर्कच होणार की अर्थ ही साचणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे, एकूण ८२६ मतदार आहेत, थेट लढतीमुळे काँग्रेससमोर मतफुटीचे आव्हान राहणार आहे. त्यामुळे महाआघाडीचे मतदारदेखील थोडे अस्वस्थ झाले आहेत.
मतदारसंघात लढत देण्याइतके संख्याबळ नाही, तेथे निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार करावा, असे आवाहन काँग्रेसला केले होते. राज्यात तीव्र उन्हाळा असून अनेक भागांत पेट्रोल-डिझेलच्या उपलब्धतेचे प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत केवळ औपचारिक लढतीसाठी निवडणूक घेण्यात काही अर्थ नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.






