kolhapur health condition
कोल्हापूर : अत्यावश्यक सेवांमध्ये आरोग्य सेवा व सुविधा येते. मात्र आपल्याकडे एकूणच व्यवस्था किती सक्षम आहे याचे चित्र समोर आले आहे. कोल्हापूरमध्ये आरोग्य सुविधा आणि व्यवस्था यांची बिकिट परिस्थिती समोर आली. कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगर वाड्यामध्ये वृद्धाला दवाखान्यामध्ये येण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतर देखील हीच परिस्थिती असल्यामुळे रोष व्यक्त केला जातो आहे.
राज्यातील अनेक खेडापाड्यांपर्यंत सोयी सुविधा पुरवल्याच जात नाही. त्यांच्यापर्यत ना विकास पोहचतो ना त्यांना निधी मिळतो. ही गावं अशी मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. याची प्रचिती देणारी घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगर वाड्यावरील ही धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. बुजवडे धनगर वाड्यावरील नवलू कस्तुरे नामक वृद्धाला रविवारी रात्री अर्धांगवायूचा झटका आला. मात्र, धनगर वाड्यावरून रुग्णालयाकडे जाण्यासाठी वाट नसल्याने त्यांना रात्रभर घरीच ठेवावं लागले. अखेर पहाटे जंगलातून पाच किलोमीटरची पायपीट करत ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. टोपल्यात बसवून त्यांना रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं. त्यामुळे या वाड्यांवर सोयी सुविधा आणि विकासकाम पोहचले नसल्याचं दिसून आलं आहे. धनगर वाड्यावर मतदार आणि साक्षरता कमी असल्याने लोकप्रतिनिधीं हा भागच विसरले आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.
गावकऱ्यांकडून रोष व्यक्त
गावापाड्यांमध्ये रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रस्तेही नाहीत आणि ॲम्ब्युलन्स देखील उपलब्ध नसतात. कोल्हापूरमध्ये रुग्णाला रस्ते आणि लाईट नसल्यामुळे रात्रभर घरीच थांबावं लागलं. तसेच निघाल्यावर टोपलीमध्ये बसवून गावकऱ्यांना त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन जावं लागलं. त्यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. मुलभूत सुविधा देखील लोकप्रतिनिधी पुरवत नाहीत, हे यातून दिसून आलं आहे. या वाड्यांमध्ये मतदारांची संख्या कमी असल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना यातना सहन कराव्या लागत आहे. तसेच सोयसुविधांना मुकावे लागत आहेत. या परिस्थितीमुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.