
फोटो सौजन्य - Social Media
विठ्ठलाचे समकालीन आणि विद्रोही विचारांचे तल्लीन भक्त श्री संत चोखामेळा यांनी आपल्या साहित्यातून बाह्य रूपापेक्षा अंतरंगातील भक्ती, समता आणि मानवी मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. “ऊसडोंगा परिरस नोहे डोंगा” असे ठामपणे सांगत समाजातील विषमता, जातिभेद आणि अन्यायाविरोधात त्यांनी देवासमोर समानतेची मागणी केली. अशा या महान संतांचे विचार व साहित्य सर्वसामान्यांपर्यंत अधिक व्यापकपणे पोहोचावे, यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे. संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळी मेहुणाराजा येथे ‘बार्टी’ संशोधन केंद्राच्या धर्तीवर संशोधन उपकेंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व संत चोखामेळा जन्मोत्सवाचे मुख्य प्रवर्तक हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
संत चोखामेळा यांच्या ७५८ व्या जयंतीनिमित्त आयोजित उत्सव सोहळ्यात सपकाळ बोलत होते. या वेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, संत चोखामेळा साहित्याचे अभ्यासक प्रा. कमलेश खिल्लारे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव नागरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश गिते, राष्ट्रवादी नेते संतोष खांडेभराड, दिलीपकुमार झोटे, रिपब्लिकन पक्षाचे दिलीप खरात, काँग्रेस नेते रमेश कायंदे, माजी जि. प. सदस्य भगवान मुंढे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा पंढरपूर येथे साजरा व्हावा आणि जन्मोत्सव हा खऱ्या अर्थाने लोकउत्सव ठरावा, अशी त्यांची अनेक वर्षांची इच्छा होती. यंदा मेहुणाराजा येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती पाहून हा उत्सव खऱ्या अर्थाने लोकउत्सव ठरल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संतांनी कधीही जात, धर्म किंवा पंथ यांचा भेद केला नाही. संत चोखामेळा यांचे विचार मानवतेला समृद्ध करणारे असून, आजच्या समाजाला एकत्र नांदण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहेत. त्यांच्या विचारांचा जागर करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापूजा व पालखी सोहळा
जयंतीनिमित्त सकाळी सूर्योदयापूर्वी संत चोखामेळा यांच्या समाधीस्थळी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गुलाबराव खरात यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर मेहुणाराजा गावातून भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. गावात ठिकठिकाणी सडा-रांगोळी काढून, फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले. महिलांनी पालखीचे पूजन करून दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी प्रा. कमलेश खिल्लारे यांनी संत चोखामेळा यांच्या साहित्याचे महत्त्व विशद करताना सांगितले की, संतांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी वेचले असून, त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी आहेत. या जन्मोत्सवात महिला, युवक व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी केले. सूत्रसंचालन गटशिक्षणाधिकारी दादाराव मसूदवाले व व्ही. एस. जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गजानन काकड यांनी मानले.