
शेवगावातील अतिक्रमणांवर चालणार हातोडा! ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर प्रशासनाची बैठक; मोजणीसाठी अर्ज दाखल
या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसान चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, अतिक्रमण हटवण्यापूर्वी संबंधित जागांची अधिकृत मोजणी आणि हद्द निश्चित करणे आवश्यक असल्याने नगरपरिषद प्रशासनाने भूमी अभिलेख कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे. याचदरम्यान शेवगाव नगरपरिषद हद्दीतील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न ‘नवराष्ट्र’ने ठळकपणे मांडल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे.
‘नवराष्ट्र’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत बैठक बोलावली. शहरातील रस्त्यांची मोजणी आणि हद्द निश्चिती पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार अतिक्रमण हटाव कारवाई तात्काळ करण्यात येईल, असे प्रशासनाने लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. या घडामोडीनंतर वंचित बहुजन आघाडीने ‘नवराष्ट्र’चे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
शेवगाव नगरपरिषद हद्दीतील विविध भागांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसान चव्हाण यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली होती.
शहरातील अनेक भागांत निवासी घरे तसेच मिश्र व्यावसायिक दुकाने असल्याने अतिक्रमण हटवण्यापूर्वी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित रस्त्यांची अधिकृत मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आला आहे. भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी झाल्यानंतर रस्त्यांच्या हद्दी निश्चित केल्या जातील. त्यानंतर प्रत्यक्षात कोणत्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे, हे स्पष्ट होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई तातडीने हाती घेतली जाईल, असे मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सांगितले आहे.
शेवगाव शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न ‘नवराष्ट्र’ने ठळकपणे मांडल्यानंतर प्रशासनाच्या हालचालींना वेग आला. संबंधित प्रश्नावर बैठक घेण्यात आली असून पुढील कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमणांविरोधात प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अतिक्रमणाच्या प्रश्नाला वाचा फोडून प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘नवराष्ट्र’चे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार मोजणी आणि हद्द निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होताच अतिक्रमणांवर धडक कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.