बारामती : बारामती शहरात बाहेरून आलेल्या एका बंटी बबली या जोडीने एका इलेक्ट्रिक बाइक कंपनीची सुरुवात करून या कंपनीची फ्रॅंचाईजी विविध भागांमध्ये देण्यासाठी प्रत्येकी १६ लाख असे कोट्यावधी रुपये गोळा करून ही जोडी सध्या गायब झाली आहे. त्यामुळे आयुष्याची पुंजी गोळा करून या जोडीकडे गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
या जोडीचे मोबाईल गेल्या चार ते पाच दिवसांपासून बंद असल्याने गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या पेट्रोलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याने वाहन चालकांनी इलेक्ट्रिक बाइक खरेदीला प्राधान्य दिले आहे. देशातील अनेक दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसह नवीन कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक बाइक बाजारात आणल्या आहेत. सुरुवातीला ग्राहकांच्या आवाक्यात असणाऱ्या या इलेक्ट्रिक बाइकच्या किंमती सध्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. बारामती शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर या बाईकची विक्री होत आहे. बारामती शहरासह ग्रामीण भागात देखील इलेक्ट्रिक बाइक चे शोरूम अनेकांनी सुरू केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती शहरात नावात विनोद असलेल्या एका व्यक्तीने इलेक्ट्रिक बाइक कंपनीची सुरुवात करून या कंपनीचे शोरूम सुरू केले होते. या कंपनीच्या बाईकचे ब्रँडिंग करण्यासाठी विविध माध्यमातून त्याने जाहिरातबाजी केली होती. अनेक प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन या महाभागाने या इलेक्ट्रिक बाइकचे ब्रॅण्डिंग केले होते, अन्य इलेक्ट्रिक बाइक च्या तुलनेत किमतीने कमी म्हणजेच ४५ हजार ते साठ हजार रुपयांना आपण ही बाईक विकत असल्याचे त्याने जाहीर केले होते. बारामती सह अन्य जिल्ह्यातील विविध भागात त्याने फ्रॅंचाईजी देखील दिलेल्या आहेत.
या कंपनीची इलेक्ट्रिक बाइक स्वस्त असल्याने अनेक ग्राहकांनी या बाईकची टेस्ट राईड घेऊन एवढी कमी किंमत का? असा सवाल व्यक्त केल्यानंतर बड्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही विशेष ऑफर ठेवले असल्याचे सांगितले जात होते. आउटसोर्सिंग द्वारे इलेक्ट्रिक बाइक बनवून स्वतः स्थापन केलेल्या कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बाइक विक्रीचा व्यवसाय या व्यक्तीने व त्याच्यासोबत भागीदार असलेल्या महिलेने हा व्यवसाय सुरू केला होता.
दरम्यान फ्रॅंचाईजीसाठी पाच लाख ते सोळा लाख रुपये गुंतवणूक असल्याचे सांगून अनेक भागातील लोकांना त्याने आकर्षित केले, या इलेक्ट्रिक बाइकचे महत्त्व पटवून त्यांना त्यासाठी ऑफर करून त्यांच्या ऐपतीप्रमाणे पाच ते 22 लाख रुपयांपर्यंत ची रक्कम या महाभागाने घेऊन कोट्यावधी रुपयांचा गंडा अनेकांना घातला. दरम्यान या इलेक्ट्रिक बाईक कंपनीचा मालक असल्याचे सांगत असलेला हा महाभाग ग्राहकांच्या समोर न येता त्याने नेमलेल्या मॅनेजरला संबंधितांशी चर्चा करायला लावत होता. दरम्यान ४० ते ५० लोकां कडून कोट्यावधी रुपये गोळा झाल्यानंतर हा महाभाग गायब झाल्याची चर्चा आहे.
या व्यवसायासाठी या महाभागाची सहकारी असलेली एक महिला देखील सहभागी आहे. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूक केलेल्या लोकांनी कधीपासून फ्रॅंचाईजी देणार? अशी विचारणा केल्यानंतर या महाभागासह त्याच्या मॅनेजरचा फोन देखील गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. सोलापूर जिल्ह्यातील मूळचा रहिवासी असलेला हा महाभाग बारामती मध्ये गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होता, असे अनेकांनी सांगितले. सुमारे ४० ते ५० लोकांकडून या बंटी -बबली जोडीने लाखो रुपये उकळले असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान बारामती शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नामांकित कंपन्यांचे शोरूम तसेच अनेक उद्योग या परिसरामध्ये सुरू झालेले आहेत. त्यामुळे बारामतीचे आकर्षण अनेकांना आहे. याचा गैरफायदा घेत नेत्यांच्या नावाचा गैरवापर करून अनेक बेरोजगारांना गंडा घातल्याची उदाहरणे यापूर्वी बारामती परिसरात घडली आहेत. दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना चुकीचे काम करणारावर थेट कारवाईचे आदेश दिले आहेत.
फसवणूक झालेले नागरिक लवकरच फिर्याद दाखल करणार आहेत, या फिर्यादीनंतर कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या महाठगाला शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण होणार आहे. दरम्यान बारामती मधील कार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांमुळे अनेक गुन्हेगारांना मोठा चाप बसला आहे, मात्र या गंभीर फसवणुकी प्रकरणी बारामती पोलीस कसा तपास करणार, हे फिर्याद दाखल झाल्यानंतर लक्षात येणार आहे.