पुणे : वारजे माळवाडी तसेच हडपसरमध्ये चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून पावणे तीन लाखांचा ऐवज चोरून पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात ६० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजेतील एनडीए रोडवरील एका सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान ते शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी बनावट चावीने दरावाजाचे कुलूप उघडून बेडरूममधील कपाटातून २ लाख ४० हजार रुपये चोरून नेले. दुपारी पावणे तीनच्या सुमारास आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले.
दुसरी घटना हडपसरमध्ये घडली असून, चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून ३३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. ही घटना ग्रिन फिल्ड परिसरातील एका सोसायटीत घडली आहे. याबाबत ३१ वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.