सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता मंडपासाठी खड्डा खणल्यास...; मंत्री लोढा यांची स्पष्ट भूमिका
मुंबई : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त महत्त्वाची बातमी समोर येत आहे.गणेशोत्सवाच्या काळात मंडपासाठी खड्डे खोदल्यास प्रति खड्डा १५ हजार रुपये खर्च आणि दंड आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. याचदरम्यान मुंबई महापालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयात आज नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनता दरबार आयोजित करत आहोत. मुंबईमध्ये आयोजित केलेला हा पाचवा जनता दरबार होता आणि त्याला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे, असे यावेळी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
नव्या नियमावलीनुसार गणेश उत्सव मंडळांनी मंडपासाठी खड्डा खणल्यास, मुंबई महापालिकेने १५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत असलेल्या नाराजीची मंत्री लोढा यांनी जनता दरबारात दखल घेतली. “गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा आणि महत्वाचा सण आहे. सर्वांनाच हा सण जल्लोषात साजरा करता यावा यासाठी आम्ही तत्पर आहोत. मुंबई महापालिकेद्वारे लावण्यात आलेल्या दंडाबाबत गणेश मंडळांच्या असलेल्या भावना आम्ही जाणतो. त्याबाबत लवकर आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू.”, असे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सी वॉर्डमधील खड्डे भरण्याचे काम येत्या १० दिवसात पूर्ण करावे, असे देखील मंत्री लोढा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. नागरिकांच्या तक्रारींमध्ये पुनर्विकास, रस्ते, ड्रेनेज, रेशन कार्ड या संदर्भातील अडचणी, पाणीपुरवठा व गणेश उत्सवाबाबत परवानग्यांचे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित झाले.
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद सशक्त करण्याचा प्रयत्न केला असून, “सरकार थेट जनतेच्या दारी” हा दृष्टिकोन त्यांनी या उपक्रमातून अधोरेखित केला आहे.
दरम्यान मुंबई शहर व उपनगरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. अशा रस्त्यांवर खोदकाम करण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे मुंबईत भर रस्त्यात मंडप घालून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये खड्यांचे संकट आले आहे. रस्त्यावरील बाप्पाची मूर्ती बसवण्यासाठी तब्बल ३५ ते ४० फुटाचे मंडप घालण्यात येतो. त्यामुळे साहजिकच या मंडपासाठी भर रस्त्यात खड्डे खोदावे लागतात. नवीन सिमेंट काँक्रीट व अन्य रस्त्यावर गणेशोत्सवामध्ये मंडप बांधण्यासाठी खड्डे खोदल्यास मंडळांना एका खड्यासाठी तब्बल १५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार होता. त्यामुळे मंडप बांधायचा कसा व मंडप बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांसाठी एवढा पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न गणेशोत्सव मंडळांना पडला आहे.