मुंबई: आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या वेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. दरम्यान एकाच टप्प्यात २८८ जागांसाठी राज्यात मतदान होणार आहे. तर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्रे आहेत. २६ नोव्हेंबर आधी राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. तर राज्यात एकूण ९ कोटी ३ लाख मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असे यांचे प्रयत्न असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले. मतदान केंद्रावर मतदानासाठी न जाऊ शकणाऱ्यांसाठी घरातून मतदानाची सुविधा करून देण्यात येणार आहे.
उमेदवारांना २३ ते २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
२०१९ मध्ये आघाडीतून लढलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला ५४ जागा मिळाल्या होत्या. यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर होता. तर कॉँग्रेस ४४ जागा जिंकून चौथ्या क्रमाकांवर होती. मात्र दोन वर्षांपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकसंघ राहिले नाहीत. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील कोणत्या पक्षाकडे किती संख्याबळ आहे, ही जाणून घेऊयात.
महायुतीमध्ये सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस व इतर मित्रपक्ष अशी युती आहे. तर महाविकास आघाडीकडे कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे अशी आघाडी आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुतीकडे 162 जागांचे बहुमत आहे. महाविकास आघाडीकडे १०५ जागा आहेत.