पुणे : वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आलेला चांदणी चौकातील (Chandani Chowk) नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी लगेच खुला होईल, असे वाटत होते. मात्र, याला अजून प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे दिसत आहे. कारण, उद्घाटन होऊन दीड-दोन दिवस झाले तरी उद्घाटनाचा मंडप रस्त्यावरून अद्यापही पूर्णपणे काढला गेला नाही.
चांदणी चौक शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. मात्र, अरूंद रस्त्यामुळे चांदणी चौकात वाहतुकीची कोंडी सातत्याने होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. दोन ऑक्टोबर रोजी जुना पूल पाडण्यात आल्यानंतर नव्या उड्डाणपुलासाठी काम सुरू करण्यात आले. त्यानंतर अडचणींवर मात करत उड्डाणपूलचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले.
चांदणी चौक उड्डाणपूल सुरू झाल्याने रविवारी अनेकजण वाहने घेऊन या पुलाकडे फेरफटका मारण्यासाठी गेले. त्यांनादेखील मुळशीकडे जाणारा मंडप काढला न गेल्याने बंद असल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे अनेकांची निराशा झाली. उद्घाटन झाल्यानंतर संपूर्ण पूल वाहनांसाठी खुला होणे अपेक्षित होते. परंतु, रस्त्यावरच मंडप घातल्याने संपूर्ण पूल सुरू होण्यासाठी मंगळवार उजाडण्याची शक्यता आहे.