आगामी निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी; चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले 'हे' महत्वाचे आवाहन
इचलकरंजी : पक्ष बळकटीसाठी नुतन पदाधिकार्यांनी अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्यकर्त्यांना केले आहे. विरोधकांकडून मतदार यादीबाबत घोळ घातला जात असून, विरोधाला विरोध केला जात आहे. पण, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर लवकरच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचेही पुनर्वसन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजी शहराला भेट दिली. यामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर ज्येष्ठ नेते कै. धोंडीराम जावळे आणि कै. पांडुरंग म्हातुकडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
प्रथमत: प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेथे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तसेच अन्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी हाळवणकर यांच्या राजकीय पूर्नवसनाचे काय? असा प्रश्न विचारल्यानंतर दादांनी नेहमीच्या शैलीत पक्ष हाळवणकरांना निश्चितपणे संधी देईल. राज्यपाल कोठ्यातील ३ जागा भाजपच्या वाट्याच्या असून एका जागेवर हाळवणकरांना संधी देण्यासंदर्भात माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याचे सांगितले. तर प्रसारमाध्यमांनी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी महायुती म्हणून लढणार असल्याचे सांगत महापौर आणि प्रभागाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर त्याला गती येईल, असेही ते म्हणाले.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी चंद्रकांत यांनी आमदार राहुल आवाडे यांच्यासह परिवारातील सदस्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. पक्ष बळकटीसाठी नुतन पदाधिकार्यांनी अधिक जोमाने काम करावे, असा सल्ला देत मतदार याद्यांच्या घोळाबाबत केवळ विरोधाला विरोध म्हणुन आरोप केले जात आहेत. पण कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादी संदर्भात मुदत दिली असताना विरोधकांकडून केवळ जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.
यावेळी किशोरी आवाडे, स्वप्नील आवाडे, मौश्मी आवाडे, वैशाली आवाडे, तानाजी पोवार, प्रकाश दत्तवाडे, सुनिल पाटील, अहमद मुजावर, श्रीरंग खवरे, बाळासाहेब माने, शशिकांत मोहिते, नजमा शेख, सपना भिसे, सीमा कमते, शेखर शहा, अरविंद शर्मा व मान्यवर उपस्थित होते.