
Chandrapur News: भद्रावतीत पाणीटंचाईचे संकट? नियमित पाणी द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा माजी नगराध्यक्षांचा इशारा
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शहराच्या विकासासाठी शासनाकडून २० कोटी रुपयांचा निधी आणून विविध विकासकामे करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र, जवळपास ११ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असतानाही शहरातील मुलभूत प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याचे धानोरकर म्हणाले. विशेषतः पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाकडे नगरप्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. (फोटो सौजन्य – AI Created)
ऑक्टोबर २०२६ मध्ये नगर परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत संभाव्य पाणीटंचाईवर चर्चा झाली. मात्र, त्यातून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांकडून पाण्याचे संपूर्ण बिल आकारले जात असताना पाणीपुरवठा मर्यादित केल्यास बिलात ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणी आपण बैठकीत केली होती, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, वरोरा नगर परिषदेने फेब्रुवारी २०२६ पासूनच संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून कूपनलिका, पाणीसाठवण, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि नाल्यांची स्वच्छता यांसारख्या उपाययोजनांचे नियोजन सुरू केले आहे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांजवळ २४ कूपनलिकांची पर्यायी व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्या तुलनेत भद्रावतीत काय नियोजन करण्यात आले, असा सवाल धानोरकर यांनी उपस्थित केला. विद्यमान नगराध्यक्षांनी पाणीटंचाईसंदर्भात बैठकाही घेतल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला.
भविष्यात संकट निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आतापासूनच कायमस्वरूपी नियोजन करणे आवश्यक आहे. सध्या शहरात दुष्काळसदृश परिस्थिती नसताना दररोज पाणीपुरवठा करणे शक्य आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मागे घेऊन नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
शहरातील विकासकामे आणि पाणीटंचाईच्या नियोजनावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. आपल्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात रखडलेली मुख्य रस्ते आणि नाल्यांची कामे प्राधान्याने पूर्ण केली आहेत. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगर परिषद सज्ज असून, शहरातील पाण्याचे स्रोत, बोअरवेल, ट्युबवेल आणि विहिरीच्या स्थितीचा आढावा घेऊन १ कोटी १६ लाख रुपयांचा उपाययोजनांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.-प्रफुल्ल चटकी, नगराध्यक्ष, न.प. भद्रावती