
Raigad News: रायगडमधील १२ हजार शेतकऱ्यांना मिळणार भाजीपाला मिनी किट; जिल्हा परिषदेचा कृषी विभागाचा उपक्रम
दुष्काळी स्थितीमुळे खरीप हंगामात भाताचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याअभावी वाळून गेले. या परीस्थितीत खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न रायगड जिल्हा परिषदेकडून केला जात आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून संपूर्ण जिल्ह्यात सुमारे १२ हजार भाजीपाला मिनी किटचे वाटप केले जाणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
रब्बी हंगामात भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देणे, घरगुती भाजीपाला उत्पादन वाढविणे आणि शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना केवळ साहित्य वाटप करून प्रशासन थांबणार नाही, तर त्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली जाणार आहे.
पाण्याची उपलब्धता, जमिनीची सुपीकता, पीक निवड आणि शेती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागण्यासोबतच शेतीच्या अडचणींवर मार्गदर्शनही मिळणार आहे.
यासोबतच महिला किसान शेतकरी प्रमाणपत्र उपक्रमांतर्गत पात्र महिला शेतक-यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग लक्षात घेऊन त्यांना स्वतंत्र उपजीविकेसाठी प्रोत्साहन देण्याचा यामागील हेतू आहे. यातून महिलांना शेतीच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे.
विशेष मार्गदर्शन शिबिरामध्ये दुष्काळ व्यवस्थापन, जलसंधारण, पाणी बचत, पीक निवड, पीक व्यवस्थापन आणि माती परीक्षण याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आआंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जमातीसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली जाणार आहे. योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि महाडीबीटी पोर्टलवरील नोंदणीबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
शेतकऱ्यांना भाजीपाला कीट वाटपाचा उपक्रम जिल्हा परि षदेने हाती घेतला आहे. त्यासाठी तालुकावार भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. शेतकरयांना मदतीबरोबरच मार्गदर्शन देखील केले जाणार आहे.- वैकुंठ पाटील, कृषी सभापती