
Chandrapur News: जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांनी पुकारले असहकार आंदोलन; सरकारकडे केल्या या मागण्या
केंद्र शासनाचा आणि पंतप्रधान मोदी यांच्या अजेंड्यावर असलेला जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या दोन्ही योजना आहेत. या दोन्ही योजना ग्रामीण भागामध्ये या कर्मचाऱ्यांच्यावतीने राबविल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनमध्ये योजना राबविणे, या माध्यमातून ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे पाणीपट्टी गोळा करणे, देखभाल दुरुस्तीबाबत ग्रामस्थांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या बैठका घेणे आदी कामे हे कर्मचारी करत असतात. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय, संत गाडगेबाबाबा ग्राम स्वच्छता अभियान, सार्वजनीक शौचालय, सांडपाणी घनकचरा व मैला गाळ व्यवस्थापन तसेच गोबरधन आदी योजना राबविण्यात येतात.
चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आंदोलनाबाबत लेखी निवेदन सादर केले. यावेळी बंडू हिरवे, प्रकाश उमक, साजीद निजामी, मनोज डांगरे, कृष्णकांत खांनझोडे, तृष्णांत शेंडे, प्रफुल्ल मत्ते, प्रवीण खंडारे, गीतेश गुप्ता, पायल फटिंग, प्रियंका रामटेके, नरेंद्र रामटेके, विशाल जुमळे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाला या विभागाने अनेक प्रथम पुरस्कार मिळवून दिले आहेत, आणि याच कर्मचाऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. गत ३ वर्षापासून ३ महिन्याने एक वेळा पगार केले जातात, राज्यस्तरीय कृती समितीने वेळो वेळी राज्य स्तरावर प्रधान सचिव यांना निवेदने दिली. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. गत २० वर्षापासून या विभागात कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यांना नोकरीमध्ये १० वर्ष झाले आहेत. त्यांना कायम करण्याबाबत औरंगाबाद मॅट कोर्टाचा निकाल लागलेला असून त्यावरही शासन कोणतीही भूमिका घेत नाही, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.