
Chandrapur News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पावर केंद्राचं लक्ष! संसदीय पॅनल बैठकीत संवर्धनाच्या आव्हानांवर चर्चा
ही समिती ताडोबा आणि नागपूरच्या ३ दिवसीय दौऱ्याचा भाग म्हणून शनिवारी (दि. २७) चंद्रपूरमध्ये दाखल झाली. खाणकाम, पर्यटन आणि विकासाच्या दबावामुळे प्रकल्पाचे भविष्य कसे घडत आहे, याचे मूल्यांकन करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. राज्यसभा खा. भुवनेश्वर कलिता यांच्या अध्यक्षतेखालील १० सदस्यीय शिष्टमंडळाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (डब्लूसीसीबी) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केंद्र आणि राज्य वन अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
समितीने, सध्या सुरू असलेले संवर्धन कार्यक्रम, वाघांच्या संख्येला असलेले नवीन धोके, अंमलबजावणीतील आव्हाने आणि संवेदनशील वनक्षेत्रांवर पर्यटनाचा वाढता दबाव यांचा आढावा घेतल्याचे समजते. यावेळी एनटीसीएचे प्रमुख त्रिवेंद्र सिंह रावत, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला आणि उपसंचालक (कोअर) आनंद येल्लू रेड्डी, तसेच नागपूरच्या निरीचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी पॅनलला वन्यजीव संरक्षण धोरणे, मानव-वन्यजीव संघर्ष निवारण, प्रदूषणासंबंधी चिंता आणि पर्यटनाचा प्रवाह नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. अधिवास व्यवस्थापन आणि प्रकल्पाच्या सीमेला लागून असलेल्या खाणकामाच्या पट्ट्यांचे परिणाम याबद्दलही समितीला माहिती देण्यात आली.
मूल्यांकनानंतर, समितीचे सदस्य आणि खा. जगदंबिका पाल यांनी रविवारी ताडोबा येथील त्यांच्या क्षेत्रीय भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली, आणि समितीच्या तपासणीमध्ये कोअर झोनमधील सकाळच्या सफारीचा समावेश होता, असे नमूद केले. पराक्रम वाधाचे दर्शन हा अनुभव ‘अविस्मरणीय’ असल्याचे वर्णन करताना पाल यांनी लिहिले की, नैसर्गिक वारसा जपण्यासाठी सामूहिक जबाबदारीची गरज आहे. हीच भावना समितीच्या ताज्या भेटीदरम्यानच्या व्यापक आढावा कार्यसूचीमध्येही प्रतिध्वनित झाली.