
Chandrapur News: मालगाड्यांना प्राधान्य, प्रवासी गाड्या रखडल्या; नागभीड मार्गावरील प्रवाशांचा संताप
पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; आर्थिक मदत न मिळाल्यास लालपरीची चाके थांबणार?
जंगलव्याप्त व एकेरी रेल्वे मार्ग असलेल्या या विभागात गेल्या दोन ते अडीच वर्षांत मालवाहतुकीत मोठी वाढ झाली असून, प्रवासी गाड्यांपेक्षा मालगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग असल्याने येथे अनेक लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्याही धावतात. मात्र, रेल्वे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुढील प्रवासाचे नियोजन बिघडत असून आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावरील अनेक स्थानके जंगल परिसरात असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा प्रवासी गाड्या तासन्तास विविध स्थानकांवर थांबविल्या जातात, तर त्याचवेळी मालगाड्यांना पुढे सोडले जात असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. त्यामुळे संतप्त प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत असून स्थानकांवरील कर्मचाऱ्यांनाही नाराजीचा सामना करावा लागत आहे.
काही ठिकाणी संतप्त प्रवाशांनी मालगाड्या अडविण्याचे प्रकार घडले असून, सोशल मीडियावरही रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर टीका करणारे व्हिडीओ आणि रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ‘रेल्वे मंत्रालयाला या मार्गावर केवळ मालवाहतूकच करायची असेल, तर प्रवासी गाड्या बंद करून टाकाव्यात, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. देशभरात रेल्वे व्यवस्थेचे आधुनिकीकरण होत असताना या मार्गावरील प्रवासी सेवा मात्र दिवसेंदिवस बेभरवशाची होत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
या रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक नियमित व वेळेवर सुरू करावी. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक यामध्ये समतोल राखून प्रवाशांना न्याय द्यावा. अन्यथा प्रवासी गाड्या चालविण्याचा दिखावा करण्यापेक्षा सेवा बंद करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर झोनचे झेडआरयूसीसी सदस्य संजय गजपुरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली.