Raigad News: शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! रायगडावरील सुरक्षेची चिंता मिटली; बंद पडलेले 54 CCTV कॅमेरे झाले सुरू
गेल्या काही महिन्यांपासून रायगडावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. गडावरील काही वादग्रस्त घटनांनंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. छत्रपतींच्या राजधानीतच सुरक्षा यंत्रणा बंद असल्याची बाब अनेक शिवभक्तांच्या मनाला खटकत होती. एप्रिल २०२६ मध्ये या संदर्भातील वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर समाजमाध्यमांमधून विविध स्तरावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. (फोटो सौजन्य – Pinterest)
रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी बंद पडलेले कॅमेरे पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक दुरुस्ती व तांत्रिक कामे पूर्ण करून गडावरील ५४ कॅमेरे ६ जूनच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून पुन्हा सुरू केले आहेत.
राजसदर, होळीचा माळ, तिकीटघर तसेच गडावरील अन्य महत्त्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, गर्दीचे नियोजन करणे तसेच कोणत्याही अनुचित प्रकारांवर वेळीच नियंत्रण ठेवणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर आणि अन्य दोन ठिकाणी पुरातत्त्व विभागामार्फत बसविण्यात आलेले चार कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. हे कॅमेरे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेही पुन्हा कार्यान्वित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Maharashtra monsoon: अरबी समुद्रात पाऊस रेंगाळल्याने राज्यात उष्णतेचा कहर;राज्यासाठी धोक्याची घंटा
२६ व २७ जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा होणार आहे. अशा वेळी सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू झाल्याने गडावरील सुरक्षा अधिक सक्षम झाली असून, छत्रपतीच्या राजधानीच्या संरक्षणासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना शिवभक्तांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांनंतर सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित झाल्याने गडाच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंता दूर झाली असून शिवभक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे.






