महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मोठी अपडेट; छगन भुजबळांचे सीए दोषमुक्त
मुंबई : महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहारामुळे राज्यभरात एकच चर्चा सुरु होती. यामध्ये तत्कालीन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांचे नाव आले होते. यानंतर आता मोठी माहिती समोर आली आहे. मंत्री भुजबळ यांचे सनदी लेखापाल (सीए) श्याम राधाकृष्ण मालपाणी यांना महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.
विशेष न्यायालयाने दोषमुक्त करण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर मालपानी यांनी त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने मालपानी यांची याचिका ग्राह्य धरून विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द केला. तसेच, मालपानी यांना महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून दोषमुक्त केले. सर्व युक्तिवाद आणि पुराव्याचा विचार करता मालपानी यांना बनावट व्यवहारांची कोणतीही माहिती होती हे सिद्ध होत नाही.
शिवाय, संबंधित गुन्ह्यांमध्ये मालपानी यांचे नाव किंवा त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलेले नाही. मालपानी हे गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचे लाभार्थी नव्हते हे पुराव्यांतून स्पष्ट होते. त्यामुळे, मालपानी यांची प्रकरणातून दोषमुक्त करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुजबळांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे सक्तवसुली सचालनालयाने (ईडी) भुजबळांसह अन्य काहीजणांवर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यात मालपानी यांचाही समावेश होता.
ईडीच्या आरोपानुसार…
ईडीच्या आरोपानुसार, भुजबळ यांच्या नियंत्रणाखालील संस्थांसाठी सीए म्हणून मालपानी यांचा आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात सक्रिय सहभाग होता. त्यांना सर्व संशयास्पद व्यवहार आणि बनावट व्यवहारांची माहिती होती. असा दावा ईडीने केला होता. दुसरीकडे, भुजबळ, त्यांचा मुलगा व पुतण्याला आधीच मूळ गुन्ह्यातून दोषमुक्त केले होते.