
Diwali Fire Incidents: "आनंदाचा सण ठरला जीवघेणा!" शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!
फटाके फोडताना झालेल्या दुर्घटनांमध्ये घाटी रुग्णालयात नऊ जणांवर उपचार करण्यात आले. यामध्ये दोघांच्या डोळ्यांना, दोघांच्या खांद्याला, तर पाच जणांच्या हाताला दुखापत झाली होती. याशिवाय जिल्हा रुग्णालयात पाच जणांवर उपचार करण्यात आले, त्यापैकी दोघांना दाखल करून नंतर सुटी देण्यात आली. खासगी रुग्णालयांमध्येही जखमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रसिद्ध डॉ. रमाकांत बेंबडे यांच्या रुग्णालयात फटाक्यांमुळे भाजलेल्या २२ जणांवर उपचार करण्यात आले, त्यापैकी आठ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
बीड बायपास परिसरात नातवासोबत फटाके फोडत असताना एका ६३ वर्षीय नागरिकाच्या डोळ्यात फटाक्याचा तुकडा गेल्याने आतील भागात गंभीर रक्तस्राव झाला. तर दुसरीकडे, स्काय शॉट फटाका फुटल्याने एका नऊ वर्षीय मुलाचे ओठ फाटले. फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे सहा वर्षीय मुलाचा हात भाजला, तर पाखड अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलाच्या पायाला दुखापत झाली.
फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळं कानात वेदना होणे, कान बंद पडणे अशा तक्रारी घेऊन अनेक जण कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे पोहोचले. तसेच फटाक्यांच्या प्रचंड धुरामुळे दमा, खोकला आणि श्वास घेण्याच्या त्रासात वाढ झाली. नातवाने फोडलेल्या नागगोळीच्या धुरामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला श्वसनाचा त्रास जाणवला, तर वर्षभरापूर्वी बालदम्याचा पंप बंद केलेल्या एका चिमुकलीला पुन्हा खोकल्याचा त्रास सुरू झाला.
या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेवरही अत्यंत विपरीत परिणाम झाला. दिवाळीपूर्वी ७० ते ८४ च्या दरम्यान असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) फटाके फुटल्यानंतर थेट २०० च्या पुढे पोहोचला, म्हणजेच हवेतील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली.
केवळ मानवी जीवितालाच नव्हे तर मालमत्तेलाही याचा फटका बसला असून शहर आणि परिसरात फटाक्यांमुळे तब्बल ३० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. यामध्ये संस्थान गणपतीजवळील मालाणी ट्रेडर्स, जयभवानीनगरमधील घर, फुलंब्रीतील तीन दुकाने, श्रेयनगरमधील गॅलरी, सिडको एन-४ मधील गुरुसाहनीनगर येथील घर, औरंगपुऱ्यातील झाड, अय्यप्पा मंदिर परिसरातील गॅरेज आणि नारेगाव चौफुलीवरील कूलर कंपनीला आगीचा मोठा फटका बसला. तसेच फटाक्यांच्या आवाजामुळं परिसरातील पाळीव प्राणी, भटके प्राणी व पक्ष्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. सण साजरा करताना स्वतःच्या आनंदासोबतच इतरांच्या आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा विचार करणे किती गरजेचे आहे, हे या संपूर्ण घटनांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
Ans: फटाक्यांमुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये ५५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Ans: शहर आणि परिसरात फटाक्यांमुळे सुमारे ३० ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या.
Ans: दिवाळीपूर्वी ७० ते ८४ असलेला AQI फटाके फुटल्यानंतर २०० च्या पुढे गेला.