वाळूज येथे स्वतंत्र महापालिका होण्याची शक्यता ( संभाजीनगर महानगरपालिका बातमी )
छत्रपती संभाजीनगर : रुग्णालयात उपचारासाठी शहराच्या औद्योगिक पट्ट्यालगतच्या वाळूज परिसराला स्वतंत्र नागरी प्रशासनाचे कोंदण मिळण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. वाळूज महानगर, सिडको महानगर परिसरासह रांजणगाव, वडगाव कोल्हाटी आणि अन्य गावांतील १२ ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण करून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने माहिती संकलन सुरू केले आहे.
विविध विभागांकडून आवश्यक तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत असून, मार्चनंतर जनगणनेची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर लोकसंख्येच्या निकषानुसार नवीन नगरपरिषद किंवा ‘क’ वर्गाची महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. मंगळवारी (दि.१७) प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी ही माहिती दिली. वाळूज परिसराच्या नागरीकरणाच्या दिशेने यापूर्वीच एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. वाळूज महानगरसाठी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे.
त्यापाठोपाठ आता स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्याच्या हालचालींनाही प्रशासकीय पातळीवर गती मिळाली आहे. औद्योगिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि नागरी सुविधांची गरज लक्षात घेता स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी महत्त्वाची ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी ऑक्टोबरमध्ये वाळूज महानगरलगतच्या १२ ग्रामपंचायतींच्या हद्दी, लोकसंख्या आणि अन्य आवश्यक तपशील संकलित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद आणि तहसील कार्यालयांकडून माहिती जमा करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदींनुसार नगरपरिषद स्थापनेसाठी आवश्यक निकषांची पूर्तता होते का, याची तपासणी केली जात आहे.
12 ग्रामपंचायतींचा समावेश
या कार्यवाहीत वडगाव कोल्हाटी, तिसगाव, शाहजापूर, पंढरपूर, करोडी, रांजणगाव शे.पू., वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, अनंतपूर, आंबेलोहळ आणि तुर्काबाद खराडी या १२ ग्रामपंचायतींचा प्रस्तावित क्षेत्रात समावेश आहे. सध्या विविध विभागांकडून प्राप्त होणारी माहिती एकत्रित केली जात आहे. मार्चनंतर जनगणनेची आकडेवारी उपलब्ध झाल्यावर लोकसंख्येचा निकष विचारात घेऊन नगरपरिषद अथवा ‘क’ वर्ग महापालिकेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वाळूज परिसराला नेमके कोणते नागरी प्रशासन मिळणार, याचे चित्र पुढील टप्प्यात स्पष्ट होणार आहे.
FAQ
1. महाराष्ट्रात नवीन महानगरपालिका कुठे स्थापन होण्याची शक्यता आहे?
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात नवीन नागरी प्रशासन स्थापन होण्याची शक्यता आहे.
2. वाळूज परिसरात किती ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण प्रस्तावित आहे?
एकूण १२ ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण करण्याचा विचार आहे.
3. कोणत्या भागांचा नवीन नागरी प्रशासनात समावेश होऊ शकतो?
वाळूज महानगर, सिडको महानगर, रांजणगाव, वडगाव कोल्हाटी आणि आसपासच्या गावांचा समावेश होऊ शकतो.






