महागाईचा फटका; ६० टक्के गृहिणींचे बजेट कोलमडले (फोटो सौजन्य - ChatGPT)
नवी दिल्ली : देशातील महागाईचा परिणाम आता सर्वसामान्य लोकांच्या स्वयंपाकघरातील आणि घरगुती खर्चावर थेट दिसून येत आहे. दूध, डाळी, तेल, भाजीपाला आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. लोकांना अनावश्यक खर्चात कपात करण्यास आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी कमी करण्यास परिस्थिती भाग पाडत आहे.
देशातील ६१ टक्के कुटुंबांचा, म्हणजेच जवळपास १० पैकी सहा कुटुंबांचा, गेल्या १२ महिन्यांत जीवनावश्यक घरगुती वस्तूंवरील मासिक खर्च २० टक्क्यांहून अधिक वाढला आहे, असे लोकल सर्कल्सने केलेल्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणात असे दिसून आले आहे. हे सर्वेक्षण देशभरातील ३२६ जिल्ह्यांमधील १.३४ लाखांहून अधिक ग्राहकांत करण्यात आले. महागाईचा सर्वाधिक परिणाम खाद्यपदार्थांवर झाला आहे. अमूल आणि मदर डेअरीने १२ नोव्हेंबर २०२६ पासून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली. चालू आर्थिक वर्षातील ही दुसरी दरवाढ आहे.
कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी दुधाच्या दरात प्रति लिटर ८ रुपयांनी वाढ केली आहे. पनीर आणि तूपही महागले. अमूलने तुपाच्या दरात प्रति किलो ५० रुपयांनी आणि बटरच्या दरात प्रति किलो १५ रुपयांनी वाढ केली आहे. वाढत्या किमतींमुळे कुटुंबे त्यांच्या खर्चाच्या पद्धती बदलत आहेत. सर्वेक्षण केलेल्यांपैकी ७४% लोकांनी अनावश्यक खर्चात कपात केल्याचे सांगितले.
वस्तू खरेदीतही करण्यात आली कपात
५०% लोकांनी सांगितले, ते पूर्वीपेक्षा मोजक्या वस्तूंची खरेदी करतात आहे. याचा अर्थ असा की, महागाई लोकांना त्यांच्या गरजांमध्ये बदल करण्यास भाग पाडत आहे. सर्वेक्षण केलेल्या कुटुंबांपैकी ८०% लोकांची इच्छा अशी की, सरकारने साठेबाजी करणाऱ्यांवर आणि कृत्रिमरित्या किमती वाढवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांसमोर खर्च आणि बचत यांचा ताळमेळ साधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
किमतींमधील सर्वात मोठी वाढ
सर्वेक्षणानुसार, ७५ टक्के ग्राहकांना तूप, लोणी आणि खाद्यतेलाच्या किमतींमध्ये सर्वांत मोठी वाढ जाणवली. दरम्यान, ७३% प्रतिसादकांनी ताज्या भाज्यांच्या किमती वाढल्याचे, तर ७१% प्रतिसादकांनी तांदूळ, गहू आणि इतर धान्यांच्या किमती वाढल्याचे सांगितले. घाऊक बाजारातही महागाईचा दबाव दिसून आला. बँक ऑफ बडोदाचा अत्यावश्यक वस्तू निर्देशांक ऑक्टोबरमध्ये ११.१% ने वाढला.
FAQ
1. देशातील किती टक्के कुटुंबांचे बजेट महागाईमुळे कोलमडले आहे?
लोकल सर्कल्सच्या सर्वेक्षणानुसार, देशातील ६१ टक्के कुटुंबांचा जीवनावश्यक घरगुती वस्तूंवरील खर्च २० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
2. महागाईचा सर्वाधिक परिणाम कोणत्या वस्तूंवर झाला आहे?
दूध, डाळी, खाद्यतेल, भाजीपाला आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर महागाईचा परिणाम झाला आहे.
3. लोकल सर्कल्सचे सर्वेक्षण किती जिल्ह्यांत करण्यात आले?
देशभरातील ३२६ जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.






