प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय (फोटो सौजन्य-X)
devendra fadnavis on Ganeshotsav in Marathi : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्य शासनाने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी हा अहवाल दिला असून त्यात काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. खोल समुद्रात मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासंदर्भात अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून न्यायालयासमोर बाजू मांडण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय आवश्यक आहेत, तसेच गणेशमूर्तीं तयार करताना पर्यावरणस्नेही सामुग्रीचा वापर व नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सव प्रथा परंपरेनुसार साजरा व्हावा. उंच व मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक मार्ग काढण्यात यावा. तसेच छोट्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात यावे. शाडूच्या व पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर करून मूर्ती बनविण्यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. डॉ. काकोडकर यांनी जल प्रदुषणाचा विचार करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यावर भर देण्यात यावा. रासायनिक रंगांमुळे जास्त प्रदुषण होते. त्यामुळे नैसर्गिक रंगाचा वापर करणे, पर्यावरणपूरक साहित्य वापरणे यावर भर देऊन जनजागृती करण्यासंदर्भात त्यांनी सूचित केले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.