संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदमधून पुढे मार्गस्थ झाली (फोटो - टीम नवराष्ट्र)
लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने व पालखी सोहळयाबरोबर असलेल्या लाखो वैष्णवांनी लोणंद नगरीतील दीड दिवसांचा मुक्काम उरकून शुक्रवारी दुपारी १ वाजता तरडगाव मुक्कामाकडे प्रस्थान केले. लोणंद पालखी तळावर माऊलींना निरोप देण्यासाठी यावेळी मोठा जनसमुदाय जमा झाला होता. यावेळी माऊली माऊलीचा एकच गगनभेदी जयघोष करत ढगाळ वातावरणात लोणंदकरांनी ज्ञानियाचा राजा असणाऱ्या माऊलींना साश्रूनयनांनी निरोप दिला.
‘माऊली ज्ञानोबा; माऊली तुकाराम’ विठूनामाचा गजर करत विठ्ठलभेटीच्या ओढीने पंढरपुरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील लोणंदचा आपला दिड दिवसाचा मुक्काम उरकून शुकवारी दुपारी १ वाजता तरडगाव मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. माऊलीच्या पालखी सोहळ्याचा लोणंदनगरीमध्ये दीड दिवसाचा मुक्काम असल्याने माऊलीच्या दर्शनासाठी सकाळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती,माऊलीचा पालखी सोहळा पालखी तळावरून मार्गस्थ होण्याअगोदर लोणंदमधले ग्रामस्थ वाजत गाजत माऊलींना गोड नैवेद्य घेऊन येत होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोमवारी सकाळी माऊलीची आरती व नैवेद्य झाल्यावर माऊली निघण्याच्या तयारीचा पहिला भोंगा झाला. त्यानंतर माऊलीच्या दोन्ही अश्व माऊलीच्या तंबूमध्ये जाऊन माऊलीचे दर्शन घेतले, माऊलीचे अश्व माऊलीचे दर्शन घेत असताना सर्वत्र माऊली माऊलीचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजर चालू होता. अश्वांनी माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर पुढील वाटचालीसाठी माऊलींचे अश्व रथापुढे जाऊन थांबले,त्यानंतर ग्रामस्थांनी व भविकांनी माऊलीची पालखी खांद्यावर घेऊन माऊली माऊलीचा गजर करत माऊलींची पालखी खांद्यावरून तळावरून आकर्षक फुलानी सजवलेल्या नेत्रदीपक रथामध्ये नेऊन ठेवली. माऊलींची पालखी रथामध्ये आणून ठेवल्यावर माऊली पुढील मुक्कासाठी मार्गस्थ झाली, यावेळेस अनेकांचे डोळे भरून आले.
हूरहूर वाटे जिवास भारी निघता माऊली सोडून आम्हासी !!
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्यांची पहाटेपासून पुढील मुक्कामासाठी जाण्याची लगबग लोणंदमधे सुरू होती, अनेक दिंडया माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वीच तरडगावच्या दिशेने मार्गस्थ होत होत्या, माऊलीच्या पुढे व मागे चालणाऱ्या मानाच्या दिंड्यांनी माऊलींच्या प्रस्थानावेळी पालखी तळावर मोठी गर्दी केली होती. माऊली लोणंद नगरीतून मार्गस्थ होत असताना माऊलींना निरोप देण्यासाठी जमलेले भाविक माऊलींच्या रथावर फुले उधळत ‘माऊली माऊली’ असा गजर करत माऊलींना निरोप देत होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माऊलींचा परतीचा प्रवास पालखी तळापासून व्यापारी पेठ, शास्त्री चौक मार्गे स्टेशन चौक, अहिल्यामाता चौक करत फलटण रोडवरून तरडगावच्या दिशेने निघाला. लोणंदच्या पुढे सरदेचा ओढा ओलांडून पालखी सोहळा फलटण तालुक्यातील कापडगाव हद्दीत पोहचताच फलटण तालुक्याच्या वतीने माऊलींचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर माऊलींचा सोहळा आपल्या पहिल्या ऊभ्या रिंगणासाठी तरडगावच्या दिशेने चांदोबाच्या लिंबाकडे निघाला.
पालखी सोहळ्यादरम्यान दीड दिवसाचा मुक्काम असणारी लोणंद बाजारपेठ एक मोठी बाजारपेठ असल्याने याच ठिकाणी अनेक दिंडी प्रमुख ,विश्वस्त आपले पुढील प्रवासासाठी आवश्यक सामान येथे भरून घेतात. दीड दिवसांच्या मुक्कामामुळे इतर गावांच्या तुलनेत लोणंद वर अतिरिक्त भार पडतो. मात्र तरीही नगरपंचायत प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग हे मनापासून वारकऱ्यांची सेवा करताना दिसत आहेत. मोबाईल टाॅयलेटचा विषयही त्यांनी चांगल्या प्रकारे हातळला आहे. ट्रॅफिक बाबत थोडे पुढेमागे झाले मात्र नगरपंचायत व पोलीस योग्य समन्वय साधून व्यवस्थीत नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोणंदचे मुख्याधीकारी, लोकप्रतिनिधी वारकऱ्यांना प्रेमाने सेवा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यापुढील काळातही पदाधिकारी बदलले तरीही मागच्यांने पुढे येणारांना मार्गदर्शन करून अशीच चांगली सेवा पुरवावी कारण वारी हा श्रद्धेचा विषय आहे., अशा भावना प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे यांनी व्यक्त केल्या आहेत.