मुंबई: सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तर विधिमंडळ परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले आहेत. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. या प्रकरणाचा तातडीने अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
काल आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार राडा झाला होता. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ देखील झाल्याचे समोर आले होते. ते प्रकरण नुकतेच घडले असताना पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा विधानभवन परिसरात जोरदार राडा झाला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली आहे. एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल गेल्याचे पाहायला मिळाले.
विधानभवनाच्या परिसरात पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये हा जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विधानभवनात गोंधळ निर्माण झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेचा अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने पडळकरांना सुनावलं
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या बोचक टीकेचे पडसाद आता सर्वत्र दिसू लागले आहेत. पडळकर यांच्या टीकेवर अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या मध्ये शिवसेनेने सुद्धा आपले मत पाडळकरांविरुद्ध व्यक्त केले आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांवर बोचरी टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाडांचा पडळकरांना टोला
‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोलावे लागते, म्हणून टीका होत असल्याचा टोला आव्हाडांनी लगावला. महाराष्ट्राच्या राजकारणात हे सर्वश्रूत आहे की, जोपर्यंत शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर आपण टीका करत नाही. तोपर्यंत मीडिया आपली दखल घेणार नाही. आपल्याला बातमीत राहायचे असेल तर बाकी काही बोलले नाही तरी चालेल. पण, शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीत बोला. काम झालेच म्हणून समजा’ असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात बुधवारी सायंकाळी दगडफेक करण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी त्यांनी सोलापूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली होती. तसेच ‘तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत’ अशी कोपरखळी त्यांनी मारली. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, असा चिमटा पडळकर यांनी पवारांना काढला.