
सांगली : जिल्हा बँकेमध्ये संचालक तानाजी पाटील (Tanaji Patil) आणि आटपाडी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख (Hanmantrao Deshmukh) यांच्यात जोरदार हमरीतुमरीचा प्रकार सोमवारी घडला. संचालक पाटील यांनी अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तालुकाध्यक्ष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी जिल्हा पोलीत प्रमुखांना निवेदन दिले असून, मला संरक्षण पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या दालनात बँकेचे संचालक तानाजी पाटील व तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्यातील तालुक्यातील वाद उफाळून आला. देशमुख यांनी माणगंगा साखर कारखाना तानाजी पाटील यांना चालवण्यास देण्याचा निर्णय तसेच यासाठी केलेला कर्ज पुरवठा बेकायदेशीर असल्याचे सांगत जिल्हा बँकेच्या विरोधात जिल्हा उपनिबधंकांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने उप निबंधकांनी बँकेकडून खुलासा मागवला आहे. यावरून पाटील हे देशमुख यांच्यावर चिडून होते. परंतु, सोमवारी हे प्रकरण हातघाईवर आले. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या दालनात पाटील व देशमुख यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली.
शिवीगाळ, धमकी, बघून घेण्याची भाषा मोठ्या आवाजात सुरु होती. त्यामुळे संपूर्ण बँकेतील वातावरण तणावग्रस्त बनले. अधिकारी, कर्मचारी अध्यक्षांच्या दालनाताकडे धावले. मात्र, अध्यक्ष नाईक यांनी मध्यस्थी करत हा वाद वेळीच सोडविला. त्यानंतर तालुकाध्यक्ष देशमुख यांनी या प्रकाराबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देत तक्रार केली आहे.