राजू पाटील यांची एकनाथ शिंदेंवर टीका
Raju Patil on Eknath Shinde : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळावर एक भाष्य केले आणि देशभरातील नद्यांच्या प्रदूषणाचा विषय चर्चेत आला. आत्ता या प्रकरणात मनसे नेते राजू पाटील यांनी वालधूनी नदी प्रदूषणा संदर्भात ट्वीट करीत नाव न घेता एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. वालधूनी नदी स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. ही नदी उल्हास नदीला मिळते. कल्याण डोंबिवली, उल्हानसगरच्या नागरीकांना या नदीचे पाणी पिण्यासाठी दिले जाते. नागरीकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी ही नदी आत्ता तरी स्वच्छ करा आणि पुण्य कमावा असे ही एका गंगेतल्या डुबकीत त्यांची पापे धुतली जाणार नाही. अशी टिका ट्वीटद्वारे मनसे नेते राजू पाटील यांनी केली आहे.
उल्हास नदी बारमाही नदी आहे. या नदीच्या पात्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्था पाणी उचलतात. ते पाणी शुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करुन नागरीकांना पुरविले जाते. मात्र या बारमाही नदीला जाऊन वालधूनी नदी मिळते. वालधूनी नदी ही सगळ्यात जास्त प्रदूषित नदी आहे. वालधूनी नदी प्रदूषणाचा विषयअनेक वेळा चर्चिला गेला आहे. वालधूनी नदी उल्हास नदीला जाऊन मिळत असल्याने उल्हास नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. हे प्रदूषित पाणी कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगरची जनता पित आहे. या प्रदूषित पाण्यामुळे काविळसारखे आजाराने नागरीक आजारी पडतात. प्रदूषण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ही सरकारचे कान टोचले होते. प्रदूषण प्रकरणी स्थानिक स्वराज्य संस्थाना १०० कोटी पेक्षा जास्त दंड आकारला होता.
गेल्या काही वर्षापासून मनसेचे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम आणि काही सामाजिक संघटना या प्रकरणी सातत्याने आवाज उठवित आहेत. आंदोलने करीत आहेत. एक दोन वेळा निवडणूकीच्या तोंडावर त्याची दखल घेऊन एकनाथ शिंदे यांनी आश्वासने दिली. मात्र अंमलबजावणी काही केली नाही. हे सत्य आहे. ज्यांनी आश्वासने दिली त्यांनी ही नदी साफ करुन लोकांना शुद्ध पाणी देऊन पुण्य कमाविण्याची नामी संधी आहे. ती त्यांनी सोडू नये. असे ही एका गंगेतल्या डुबकीत त्यांची पापं धुतली जाणार नाहीत अशी खोचक टिका मनसेने नेते राजू पाटील यांनी करीत वालधूनी नदी प्रदूषणाच्या मुद्याकडे लक्ष वेधले आहे.