इचलकरंजी: इचलकरंजीकरांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वस्त्रोद्योगाचा वीजेचा प्रश्न आणि महानगरपालिकेचे जीएसटी अनुदान हे सर्व प्रश्न नजीकच्या काळात निश्चितपणे मार्गी लावले जातील, इचलकरंजीकरांना पाणी देणारच अन् नसेल तर आपण शोधून काढू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीत व्यक्त केला.
700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आणि त्यानिमित्ताने येथील केएटीपी ग्राऊंडवर आयोजित विकास पर्व महासभेत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, गत सहा महिन्यात राज्य सरकारने पारदर्शी कारभारासाठी 100 दिवसांचा कार्यक्रम राबविताना सर्व कार्यालये गतीमान करण्यासह लोकाभिमुख केली. आता पुन्हा तीन टप्प्यात 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2029 मध्ये उद्दीष्टांचा आराखडा केला जाईल. तर 2035 मध्ये राज्याला व जनतेला काय देणार हे निश्चित करुन त्यातून विकसित महाराष्ट्र निर्माण केला जाईल. तर इ गव्हर्नेसच्या माध्यमातून राज्य सरकार व त्याची विविधांगे यातून ऑनलाईन सेवा पुरविली जाईल. त्याच माध्यमातून पुढच्या टप्प्यात आवश्यक ते सर्व दाखले हे नागरिकाच्या व्हॉटस्अप मिळण्याची सुविधा दिली जाईल. महापूरामुळे सातत्याने भयानक परिस्थिती निर्माण होत असून तो सोडविण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याचा प्रकल्प तयार केला आहे. परंतु मधील अडीच वर्षाच्या काळात तो रेंगाळला होता.
आता तो पुन्हा गतीमान देत या प्रकल्पाचे टेंडर या 15 दिवसात काढली जाईल. त्यातून पूराची समस्या दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर महापूरासाठी कारणीभूत ठरणार्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला राज्य सरकारचा विरोधच आहे. त्यामध्ये आम्ही मागे हटणार नाही असे सांगत प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जावून असे ते म्हणाले. शिवाय पूराचे दुष्काळी भागात वळविण्याचा प्रकल्प झाल्यास अलमट्टीचा धोकाच उरणार नाही. राज्यात तब्बल 150 टीएमसी पाणी हे समुद्रात मिसळते. तेच पाणी वळविल्यास अर्ध्या महाराष्ट्रातील दुष्काळ दूर होईल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, दिला शब्द पाळणारा असा मुख्यमंत्री असून अवघ्या सहा महिन्यातच तिबल इंजिन सरकारची ताकद इचलकरंजीतील विकासकामांच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. सहा महिन्यात 750 कोटीचा निधी आणून राहुलने विकासगंगा आणत माझ्या आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनाही मागे टाकले आहे. सतत भेडसावणारा वीजेचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्राला सोलरचे राज्य बनवावे. तर इचलकरंजीचा पहिला महापौर हा भाजपाचा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून भाजपाला एक नंबरची पार्टी करण्यासाठी जीवाचे रान करुया. कोल्हापूर जिल्ह्यात सगळीकडे कमळ फुलवूया असे आवाहन केले.
इचलकरंजीला सातत्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत असून शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड उद्भव दुधगंगा योजनेला विरोध होत असल्याने ती थांबली आहे. कोणताही वाद अथवा विरोध होणार नाही यावर तोडगा असल्याचे सांगत रेंदाळपर्यंत आलेल्या कालव्यातून दुधगंगेचेच पाणी इचलकरंजीसाठी येणार आहे. त्यामुळे हा तोडगा मान्य करुन पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी करत विरोधाला चाप लावण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्री सर्वच प्रश्न सोडवतील, असे सांगितले. इचलकरंजीला सोलर सिटी करा म्हणजे इचलकरंजी एक्स्पोर्टचे जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर बनेल अशीही मागणी हाळवणकर यांनी केली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनजंय महाडीक, यांचे सह आमदार , भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.