
“नामांतरानंतर पहिला महापौर भाजपा–राष्ट्रवादी युतीचा करा; 1 महिन्यात ‘हा’ प्रस्ताव मंजूर होईल,” मुख्यमंत्र्यांचे आवाहन
अहिल्यानगर येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादी–भाजपा युतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे निवडणूक प्रभारी आमदार विक्रमसिंह पाचपुते, माजी खासदार डॉ. सुजय विखे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा व राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, युतीचे पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून ही अत्यंत सकारात्मक सुरुवात आहे. ज्याची सुरुवात चांगली होते, त्याचा पुढील प्रवासही चांगलाच होतो. गेल्या ७० वर्षांत शहरांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. गावांचा विकास महत्त्वाचा असतानाच, शहरांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन आणि झोपडपट्ट्यांच्या समस्या निर्माण झाल्या.
२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गावांसोबतच शहरांचा समतोल विकास साधण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाच्या GDP पैकी सुमारे ६५ टक्के योगदान शहरांकडून मिळते. त्यामुळे शहरांना अधिक सुविधा दिल्यास ती विकासाची केंद्रे बनू शकतात, या विचारातून स्मार्ट सिटी, अमृत शहर, अमृत भुयारी गटार योजना आणि अमृत पाणी योजना राबवण्यात आल्या. या योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा निधी शहरांना उपलब्ध करून देण्यात आला.
आवास योजनेअंतर्गत ३० लाख घरे देण्यात आली आहेत. मात्र अनेक झोपडपट्टीधारकांकडे जागेचा मालकी हक्क नसल्याने अडचणी येतात. आता या नागरिकांना जागेचा हक्क देऊन त्यावर घरे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी अशा नागरिकांना मालकी हक्काचा पट्टा देऊन PR कार्ड देण्याचे काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
अहिल्यानगरसाठी अमृत पाणी योजनेअंतर्गत ४९२ कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे प्राप्त झाला असून, महापौर निवडून आल्यानंतर एक महिन्यात हा प्रस्ताव मंजूर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याशिवाय अमृत भुयारी गटार योजनेसाठी १६४ कोटी रुपये, तर नगरोथान योजनेतून रस्त्यांच्या कामांसाठी १५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. डीपी योजनेतील रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून त्यावरही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. महापालिकेत भाजपा–राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
फाळणीनंतर अहिल्यानगरमध्ये वास्तव्यास आलेल्या सिंधी समाजाच्या कुटुंबांना ज्या जागांवर वसवण्यात आले, ते आजही तेथेच वास्तव्यास आहेत. मात्र त्या जागांचा मालकी हक्क त्यांच्या नावावर नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी त्या जागांची मालकी सिंधी समाजाला देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
अहिल्यानगर एमआयडीसीच्या विस्तारासाठी प्रयत्न सुरू असून, शहराचा समावेश नॅशनल डिफेन्स कॉरिडॉरमध्ये करण्यात आला आहे. यामुळे विविध संरक्षणविषयक कंपन्या येथे येतील आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.