पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर भाष्य केले आहे. त्यांचे खायचे वांदे आहेत, न्युक्लिअर बॉंबच्या गोष्टी ते काय सांगतात, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानवर केली. सिंधु करारानुसार पाणी बंद केले, तर पाकिस्तानवर तहानने मरण्याची वेळ येईल असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर आले असताना, पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या राज्यातील सहा पर्यटकांच्या परिवारांना जी काही मदतीची आवश्यकता लागेल, ती सर्व मदत राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत सरकारने उचललेल्या पावलांविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मत मांडले. ‘‘जे लोक व्हिसा घेऊन पाकिस्तानमधून आले आहेत, त्यांना नोटीसा दिल्या असून, ते परत जात आहेत. आपल्याकडे बांगलादेशी ज्या प्रमाणात बेकायदेशीर वास्तव्य करीत असल्याचे आढळते, तेवढे पाकिस्तानी आढळत नाहीत.
जे लोकं पाकिस्तानातून या ठिकाणी व्हिसा घेऊन आलेले आहेत, त्यांची सर्व माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. जर कोणी अवैधरित्या आलं असेल तर त्यांनाही शोधण्याची कारवाई सुरू असते. त्यामुळे आता पहिल्यांदा जे लोक व्हिसा घेऊन पाकिस्तानमधून आलेले आहेत, त्यांना ४८ तासांत बाहेर काढायचं आहे. त्या संदर्भात पोलीस व्यवस्थित काम करत आहेत’’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
“खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला हे समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता ही भारतावर आहे. त्या प्रकारे ते दहशतवाद्यांना समर्थन देतात आणि मानवतेचा एक प्रकारे खून करतात. मला असं वाटतं जगातला कुठलाही देश पाकिस्तानबरोबर उभा राहू शकत नाही. त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत आणि ते न्यू क्लिअर बॉम्बचं काय सांगतात?”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.