मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडच्या दौऱ्यावर , 65 हजार लोकं येणार; मुंडे बंधू-भगिनी उपस्थित राहणार का? सुरेश धस म्हणाले...
संतोष देशमुख हत्याप्रकरण व खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडमुळे बीड जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच, महायुतीमधील भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर जात आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उडणवीस बीड दौऱ्यावर असून आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या कार्यक्रमाबाबतची माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने लोक जमण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात कार्यक्रमाला येत आहेत. खुंटेफळ धरणाच्या बोगद्याच्या प्रकल्पाच्या कामाच्या शुभारंभासाठी ते येणार असून 1.68 टीएमसी पाणी येथील शेतकऱ्यांना मिळणार आहे. सन 2005-06 पासून ही योजना माझ्या डोक्यात होती. या प्रकल्पामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास 27 हजार 500 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्ह्यात जोरदार स्वागत करणार असून 65 हजार लोक या कार्यक्रमाला येणार आहेत, अशी माहिती आमदार धस यांनी दिली. मात्र, जिल्ह्यातील दोन मंत्री मुंडे बंधु-भगिनींबाबतच्या वक्तव्यावर त्यांनी मोठं वक्तव्य केलं. जिल्ह्यातील मंत्री आणण्याची आमची क्षमता नाही, पण जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांची नावं पत्रिकेवर आहेत, असे सुरेश धस यांनी म्हटलं. या कार्यक्रमानंतर मच्छिंद्रनाथाच्या समाधीवर मुख्यमंत्री दर्शनासाठी येणार आहेत. यावेळी, 10 कोटी रुपयांच्या गाभाऱ्याचा शुभारंभ करणार आहेत, असेही धस यांनी म्हटलं. या बैठकीला बीड जिल्ह्यातील दोन्ही मंत्री उपस्थित राहणार का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे करुन करुन काय करेल. धनंजय देशमुख यांनी जी सूचना केली त्याबाबत पोलिसांनी दखल घ्यावी. महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना देखील लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. जिल्हा नियोजनच्या 73 कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रे हे अद्याप अजित पवारांना दिलेली नाहीत. कोरोना काळात “यांनी” (मुंडे) जी लफडी केली, त्याची कागदपत्रे बाहेर काढणार आहे. परळी नगरपरिषदेत देखील मोठा घोटाळा असून तोही बाहेर काढणार आहे, असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं