कल्याण : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सर्व पक्षातील उमेदवारांनी निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चारही विधानसभा मतदार संघातून सर्वात जास्त इच्छूक शिंदे गटातील पदाधिकारी आहेत. ज्याप्रकारे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ दिसत आहे त्यामुळे आता उमेदवारी द्यायची कोणाला असा पेच पक्षश्रेष्ठीसमोर निर्माण होणार आहे.
शिवसेनेच्या फूटीनंतर कल्याण डोंबिवली कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर हे शिवसेना शिंंदे गटात गेले. पाच वर्षापासून आमदार असलेले भोईर निवडणूकीची चाहूल लागताच सक्रीय झाले आहेत. विश्वनाथ भोईर पाठोपाठ शहर प्रमुख रवी पाटील, शिवसेना माजी नगरसेवक श्रेयस समेळ यांनी देखील आमदारकीसाठी कंबर कसली आहे. टिटवाळ्यातील शिवसेना पदाधिकारी मयूर पाटील यांनीही त्यांच्या परीने तयारी सुरु केली आहे. या चौघांचा दावा आहे की त्याना उमेदवारी मिळणार. येणाऱ्या काळात काय होणार ते लवकर स्पष्ट होणार आहे. मात्र कल्याण पश्चिमेत ज्या प्रकारे शिवसेनेतील पदाधिकारी आणि आमदारांत स्पर्धा ते पाहता उमेरवादीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
कल्याण पूर्वेत शिवसेना विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, शहर प्रमुख महेश गायकवाड आणि उपशहर प्रमुख विशाल पावशे यांची नावे चर्चेत आहेत. या तिघांनी त्यांच्या परीने निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, निलेश शिदे यांना कल्याण पूर्वेतील उमेदवारी दिली जाऊ शकते. निलेश शिंदे यांना उमेदवारी दिली गेली तर महेश गायकवाड आणि विशाल पावशे यांची काय भूमिका असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण महेश गायकवाड यांनी गेल्या चार वर्षापासून तयारी सुरु केली आहे.
हेदेखील वाचा – डोंबिवलीत गाडी पार्किंगच्या वादातून राडा, एकाचा दुर्दैवी मृत्यू
डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून दिपेश म्हात्रे, राजेश मोरे, राजेश कदम यांच्या नावाची चर्चा आहे. या विधानसभा भाजपकडे आहे. रविंद्र चव्हाण यांच्या उमेदवारी बदल करणे अशक्य आहे. तर इच्छूक उमेदवार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. कल्याण ग्रामीण मतदार संघातून शिंदे गटाकडून राजेश मोरे, महेश पाटील, रमाकांत मढवी या नावांची चर्चा आहे. यामध्ये उमेदवारी कोणाला दिली जाते हे जागा वाटपानंतर स्पष्ट होणार आहे.
कल्याण पश्चिम ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. या जागेवर भाजप देखील दावा करीत आहे. कल्याण पूर्व ही जागा भाजपकडे आहे. या जागेवर शिंदे गटाचा दावा आहे. डोंबिवली भाजपची जागा आहे. त्या ठिकाणीही शिंदे गटाचा दावा आहे. तर कल्याण ग्रामीण मनसेकडे आहे. त्याठिकाणी शिंदे सेनेचा दावा आहे. त्यामुळे युतीत ही जागा काेणाकडे जाते. हा प्रश्न आहे. एकतर जागा कोणाला साेडली जाणार आहे हा प्रश्न आहे. तर उमेदवारी द्यायची ही डोकेदुखी पक्षश्रेष्ठीची वाढणार आहे.