
Harshali Thavil name leading for Kalyan Dombivli Municipal Corporation KDMC Mayor
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणाची संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. आरक्षण सोडतीमध्ये केडीएमसीचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. या आरक्षणामुळे भाजप महापौरपदाच्या शर्यतीतून तांत्रिकदृष्ट्या बाहेर पडला आहे. सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवार आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही हर्षाली थविल यांच्या नावाची आहे.
हे देखील वाचा : अनवधानाने नाव राहिले, एवढा वाद कशासाठी?’; गिरीश महाजनांच्या स्पष्टीकरणाने नव्या वादाची ठिणगी
कल्याण डोंबिवलीत महापौर हे पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र भाजपचा एकही या प्रवर्गातील नाही. त्यामुळे भाजपने आता गट स्थापनेवर लक्ष केंद्रित केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे पारडे जड झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाकडे या प्रवर्गातील दोन सक्षम उमेदवार आहेत. हर्षाली थविल आणि किरण भांगले अशी या दोघांची नावे आहेत. यात हर्षाली थविल या अनुभवी असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
महायुतीत अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता
यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मनसेची देखील साथ मिळाली आहे. मनसेने ५ नगरसेवकांसह शिवसेनेला पाठिंबा दिल्याने महायुतीचे संख्याबळ भक्कम झाले आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचे राजकारण रंगले आहे. त्याचबरोबर नाराज झालेले भाजपचे सर्व 50 नगरसेवक हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेले आहेत. महायुतीत अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. भाजप सध्या महापौरपदाच्या शर्यतीत नसली तरी उपमहापौरपद किंवा स्थायी समिती सभापती पदावर आपली पकड मजबूत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.
हे देखील वाचा : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार; खासदार सुप्रिया सुळेंनी थेट जोडले हात
दरम्यान महापालिका प्रशासनाने महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार महापौर पदासाठी २९ आणि ३० जानेवारी सकाळी ११ ते ५.३० या वेळेत दोन दिवस अर्ज दाखल करावे लागणार आहे. येत्या ३ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. तसेच ३ फेब्रुवारी रोजी सकाळी महापालिकेत विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून, तिथेच नव्या महापौरांची घोषणा होईल.